न्याय मिळेपर्यंत लढतच राहू; पीडितेच्या कुटुंबीयांना राहुल आणि प्रियंका गांधींचे आश्वासन

rahul Gandhi & Priyanka Gandhi

नवी दिल्ली :- हाथरस येथे सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर उपचारादम्यान मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली .यावेळी प्रियंका यांना पाहताच पीडितेच्या कुटुंबीयांच्या अश्रूचा बांध फुटला. त्यांचा आक्रोश पाहून प्रियंका यांनाही अश्रू अनावर झाले.

आज संध्याकाळी उशिरा प्रियंका  आणि राहुल गांधी या पीडित कुटुंबाच्या घरी पोहचले. घरात जाताच प्रियंका यांनी पीडित तरुणीच्या आईची गळाभेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केलं. त्यामुळे पीडितेची आई गहिवरून गेली आणि तिच्या अश्रूचा बांध फुटला. पीडित तरुणीची आई हमसून हमसून रडू लागल्याने प्रियंका यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी न्यायासाठी आम्ही संघर्ष करू. काँग्रेस आणि गांधी कुटुंब तुमच्यासोबत आहेत. तुम्ही एकटे नाहीत, असं सांगत राहुल यांनी या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. तब्बल २५ मिनिटे राहुल आणि प्रियंका गांधी पीडितेच्या घरी होते. यावेळी त्यांनी त्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं.

पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल यांनी माध्यमांशी संवाद साधला. राहुल  व प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या घरातून बाहेर पडताच माध्यमांनी त्यांना घेरले. माध्यमांना फार काही न बोलता केवळ त्यांनी अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील. जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही, असे सांगितले. तसेच पीडित कुटुंबाची सुरक्षा करण्यात योगी सरकार फेल गेल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्याचं केवळ निलंबन करण्यात येऊ नये तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, तसंच कुटुंबाला धमकी देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी पीडित कुटुंबीयांची इच्छा आहे. कुटुंबाला त्यांच्या मुलीला अखेरचं पाहताही आलं नाही. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असायला हवी. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना व्यक्त केली. आम्ही अन्यायाच्या विरोधात उभं राहू. जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आम्ही लढतच राहू, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER