अमेरिकेने जाआसंचे संबंध तोडले; चीनच्या हातची बाहुली – ट्रम्प यांचा आरोप

we will be terminating our relationship with WHO-Trump

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली. ही संघटना चीनच्या हातची बाहुली बनली आहे, या शब्दात त्यांनी जागतिक आरोग्य संगटनेची संभावना केली. कोरोनाची साथ पसरण्यासाठी चीन जबाबदार आहे आणि जागतिक आरोग्य संघटना चीनला पाठीशी घालते याची फळे जाआसंला भोगावे लागतील, असे ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितले होते.

जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णत: चीनची पकड आहे. अशा परिस्थितीत अमेरिका त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडत आहे. सुरूवातीला जागतिक आरोग्य संघटना कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरली. वर्षाला केवळ ४० दशलक्ष डॉलर्सची मदत करूनही जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचे वर्चस्व आहे. अमेरिकेका संघटनेला दरवर्षी ४५० दशलक्ष डॉलर्सची मदत करते परंतु संघटना आवश्यक त्या सुधारणा करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत, असे ट्रम्प म्हणालेत.

जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा जो निधी थांबवण्यात आला आहे, तो जगातील अन्य आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरूअसे ट्रम्प म्हणाले. चीनच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांचीही माहितीही यावेळी त्यांनी दिली.

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोनाचा उल्लेख ‘वुहान व्हायरस’ असा केला. चीनने वुहान व्हायरसची माहिती लपवल्यामुळेच तो जगभरात पसरला. या व्हायरसमुळेच अमेरिकेतील १ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्य़ू झाला. जगभरातही लाखो लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे, असं ट्रम्प म्हणाले.

निधी रोखला होता

ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसच्या संकटात योग्यरित्या काम न केल्याचा ठपका ठेवत जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला होता. जोवर करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची समीक्षा केली जात नाही तोपर्यंत हा निधी रोखू असे ट्रम्प म्हणाले होते व जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER