मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : मुख्यमंत्री

Uddhav

मुंबई : मराठी भाषेला अनेक वर्षांचा इतिरहा असून ही खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. आपण सर्वांनी मिळून ती जपली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मराठी शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मांडले. हे विधेयक विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आले. या विधेयकाच्या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते. देशाची राज्यघटना लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे महात्मा फुले हेही मराठी होते.

मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा असून आज्ञापत्र देणारी ही मराठी भाषा आहे. समाज म्हणजे काय, जगायचे कसे? हे मराठी भाषेने शिकविले. इंग्रजांना वठणीवर आणणारी मराठी भाषा होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असे ठणकावून मराठी भाषेतूनच लोकमान्य टिळकांनी सांगितले. हीच मराठीची शक्ती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य दिवाकर रावते, शरद रणपिसे, हेमंत टकले यांनी भाग घेतला.