आमचे नेमके काय चुकते याचा विचार करावा लागेल : पाथर्डीतील शेतकरी आत्महत्येवर थोरात

Balasaheb Thorat

संगमनेर (जि. अहमदनगर) :- राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतक-यांना बळ देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करत आहे. शेतकरी कर्जमाफी योजना शेतक-यांना कुठल्याही त्रासाविना राबवली जात आहे. असे असतानाही शेतक-यांनी आत्महत्या का केली? यात नेमके आमचे काय चुकते याचा विचार आम्हाला करावा लागेल, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब विखे यांनी आज येथे व्यक्त केले.

थोरात पत्रकारांशी बोलत होते. पाथर्डी तालुक्यातील शेतक-याने केलेली आत्महत्या दुर्देवी असल्याचे ते म्हणाले. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात तिस-या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केल्यानंतर दोन दिवसांनी काल रात्री या मुलाच्या वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

सरकारने मदत दिल्याशिवाय शेतकरी उभा राहू शकत नाही. तरीही शेतक-यांनी आपले मनोबल पक्के ठेऊन आणि समस्याना सामोरे जावे. कुटुंब आपल्या पाठीमागे आहे. हा विचार केला पाहिजे तर सरकार सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे आहे, असे ते म्हणाले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या भाजपा सरकारने त्याचे विधेयकात रूपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता न्यायालयात टिकेल असे आरक्षण मुस्लिम समाजाला देणार असल्याचे थोरात म्हणाले.