‘मुंढे सर, पुन्हा नागपुरात या !’ तुकाराम मुंढेंना नागपूरकरांनी दिला निरोप

Tukaram Mundhe

नागपूर : फुलांचा वर्षाव, प्रचंड गर्दी आणि शेकडोंच्या डोळ्यांत पाणी. we miss u मुंढे सर… पुन्हा नागपुरात या… असे म्हणत तुकाराम मुंढे यांना हजारो नागरिकांनी भावपूर्ण निरोप दिला. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची बदली झाली असून आज ते परिवारासह मुंबईसाठी रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर त्यांच्या निवासस्थानी जमले होते.

तुकाराम मुंढेंचं समर्थन करणाऱ्या नागपूरकरांकडून यावेळी ‘We Want Munde Sir’ अशा घोषणा देण्यात आल्यात. मुंढे यांची बदली झाल्यानंतर आज निरोप देताना नागपूरकर (Nagpur) त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. स्पष्ट आणि रोखठोक कामामुळे तुकाराम मुंढे हे नागरिकांच्या मनातले अधिकारी आहेत. ते जेथे जातील तेथे कडक शिस्त, राजकीयांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई लढतात.

त्यांच्या या कामामुळे ते जिथे असतील तेथे नागरिकांच्या हृदयात घर करतात. नागपूरकरांच्याही मनातले प्रिय अधिकारी, नागपूरचे हीरो असे स्थान त्यांना मिळाले. अल्प काळातही त्यांना नागपूरचे हीरो अशी नागरिकांकडून पदवी मिळाली. तुकाराम मुंढे हे आज त्यांच्या कुटुंबासह मुंबईला निघाले होते. तेव्हा नागपूरकरांनी त्यांच्यावर मोठा फुलांचा वर्षाव केला.  त्यांच्या गाडीपुढे येऊन अडवण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला.

त्यावेळी मुंढे यांनी गाडीच्या बाहेर येऊन नागरिकांचे अभिवादन स्वीकारत भूमिका स्पष्ट केली.  त्यानंतर नागपूरकरांनी त्यांच्या गाडीला वाट करून दिली. यावेळी नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. शेकडो नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी केली तर काही नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठविणार असल्याचे यावेळी सांगितले.

पहिल्यांदाच एखाद्या सनदी अधिकाऱ्यावर नागपूरकरांनी एवढे प्रेम केल्याचे चित्र बघायला मिळाले. नागरिकांनी तुकाराम मुंढे यांच्याकरिता भेटवस्तू आणल्या होत्या. त्यांच्या नावाचे फलक रस्त्याच्या दुतर्फा घेऊन उभे होते. सर्व नागरिकांचे विनम्रतेने अभिवादन स्वीकारत तुकाराम मुंढे नागपूर विमानतळाकडे  कुटुंबीयांसह रवाना झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER