मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू : अजित पवार

पुणे :- मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme court) निकाल सर्वांसाठीच धक्कादायक आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

आज अजित पवार यांनी पुण्यात कोरोना (Corona) परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीसह मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज ठेवली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेला निर्णय धक्कादायक आहे. मात्र, सरकार आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. किंवा आवश्यकता पडल्यास मध्येच एक दिवसाचे अधिवेशन घेऊन एक ठराव करण्यात येईल. वेळ पडल्यास सर्व पक्षीयांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू.” असे पवारांनी सांगितले.

केंद्रावर टीका

रशियाने भारताला कोरोनाची लस दिली आहे. मात्र, आपण आपल्या देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण न होताच इतर देशांना लसी पाठवल्या. हा अत्यंत चुकीचा निर्णय होता, अशी टीका पवारांनी केंद्रावर केली. ४५ वयोगटाच्या पुढील नागरिकांना लस देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारला लस स्वस्तात मिळत आहे. मात्र, राज्यांना महागड्या दरात लस मिळत आहे. सिरमचे अदर पूनावाला परदेशात आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या १० ते १२ दिवसात ते भारतात येतील. ते आल्यावर लस आणि लसींच्या दरांबाबत त्यांच्याशी चर्चा करू. लस नसल्याने ही अडचण निर्माण होत आहे, असे पवारांनी सांगितले.

निर्णय मुख्यमंत्री घेतील

त्याचबरोबर, यावेळी त्यांनी पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, पुण्यात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश पवार यांनी दिले. राज्यात लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्हा खरीप हंगाम तयारीचा आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button