मित्रहो, आम्ही दिलेला शब्द जपला; आरेचं जंगल वाचवलं – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

मुंबई: आरेचं जंगल वाचवण्यासाठी वृक्षप्रेमींनी अनेक आंदोलने केली होती. महानगराच्या मध्यभागी असलेले हे जंगल वाचवण्यात अखेर महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला व ते यशस्वी होताना दिसत आहेत. आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवून  येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचे मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘मित्रहो, आम्ही दिलेला शब्द जपला; आरेचं जंगल वाचवलं’ अशी आठवण करून दिली आहे. तसेच, आरे जंगल वाचविण्यासाठी आम्ही तुरुंगात गेलो; पण आधीचे सरकार नमले नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय उद्धव सरकारने घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी मेट्रो-३ साठी कोणत्याही परिस्थितीत कारशेड होणार नाही हे स्पष्ट झाले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, दुग्धविकास मंत्री सुनील केदार, वनमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

तर, जिंतेंद्र आव्हाड यांनी आरेसाठी केलेल्या आंदोलनाची आठवण करून देत, आम्ही दिलेला शब्द जपला. आरेचं  जंगल वाचावं ह्यासाठी माझ्यासहित अनेक जणांनी आंदोलनं केली, तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही; परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला.  अभिनंदन! आपणा सर्वांच्या  संघर्षाचा विजय असो, असे ट्विट करून वृक्षप्रेमींचे अभिनंदन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER