विश्वासघात झाल्याने आम्हाला विरोधी बाकावर बसावे लागले, चंद्रकांतदादांनी व्यक्त केली खंत

Chandrakant Patil - Maharastra Today
Chandrakant Patil - Maharastra Today

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज परत एकदा सत्ता स्थापन न करण्याची खंत व्यक्त केली. जनतेने आम्हाला पुन्हा सत्ता सांभाळण्यासाठी बहुमताने निवडून दिलं. पण समोरच्याने विश्वासघात केला आणि आम्हाला विरोधी बाकावर बसावे लागले, अशी खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, सध्या कोरोनामुळे राज्यात संकट निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आला आहे. ऑक्सिजनचा पुरवठाही लवकरच पूर्ववत होणार आहे. कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही. मात्र, कोविड आहे म्हणून हवं ते करून घ्या, असंही चालणार नाही. शेवटी लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. मात्र आमच्यासोबत विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधी पक्षनेते झालो. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा पाटीलयांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरील धाड हा सीबीआयचा दुरुपयोग असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. सत्ताधाऱ्यांकडून सीबीआय यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कोर्टाने या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असेल तर मग उद्याच कोर्टात अवमानना याचिका दाखल करतो, असा इशारा देतानाच लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. कोर्टाने केवळ चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. त्यात शेवटच्या पॅऱ्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यात सत्तेचा दुरुपयोग आला कुठे?, असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी विरोधकांच्या प्रश्नाची हवाच काढून घेतली.

सुप्रीम कोर्टाने मोदींना फटकारले की बघा कोर्टाने केंद्राला फटकारले, असं संजय राऊत सांगतात, पण महाराष्ट्राला फटकारले की ते मॅनेज असल्याचा आरोप ते करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये २०० हून अधिक जागा भाजपला मिळणार आणि पंढरपूरच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा झेंडा फडकणार, असा दावाही त्यांनी केला. आमचा विजय झाला की ईव्हीएम घोटाळ्याचा विषय बाहेर येतो. त्यांचा विजय झाला की सारं काही सुरळीत असतं, असा चिमटाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. केजरीवाल- मोदी वादावरून लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्याच्या वृत्तावर अशी टीका करणाऱ्यांची कीव येते असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button