…आमची दोस्ती होती जंगलातल्या वाघाशी; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोमणा

Maharashtra Today

मुंबई : आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे, असा टोमणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत यांना मारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या भेटीसंदर्भात काल पुण्यात चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहोत.

पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणालेत – वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा.

…तर सामनात माझ्यावर आठवड्याला एक अग्रलेख नसता!
याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की – आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटु बोलायला नको. मनाविरुद्ध का होईना, संजय राऊतांनी मला गोड म्हटले आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनापासून मी त्यांना गोड वाटत असतो तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता.

मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट दिला. मी म्हटले चांगले आहे. आमची वाघांशी दोस्ती आहे. तर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटले आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झाला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button