आम्ही नेहमीच अभिनय करत नाही

tejaswini pandit - Maharashtra today
tejaswini pandit - Maharashtra today

एका हाताने मदत केली तर ती दुसऱ्या हातालाही कळू नये असे दातृत्वाचे तत्त्व आहे. समाजाच्या मदतीसाठी धावणारे अनेक दाते हे तत्त्व मनापासून पाळत असतात. समाजात असे अनेक लोक आहेत जे मदत केल्यानंतर कुठेही आपलं नाव येणार नाही याची काळजी घेतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचेही मदत करतानाचे हेच मत आहे. मग तुम्ही म्हणाल, दोन दिवसांपूर्वी तेजस्विनीने जे रक्तदान केले त्याचे फोटो आणि पोस्ट तिने सोशल मीडियावर (Social Media) शेअर का केली? हा प्रश्न तेजस्विनीच्याही मनात आला होता आणि म्हणूनच तिने या प्रश्नाचे उत्तरही तिच्या खास शैलीत दिले आहे. मदत केल्याचे जगाला सांगायचे नसते याच्याशी मी सहमत असले तरी आम्ही कलाकार प्रसिद्धीसाठी मदत करत असतो असा एक गैरसमज आहे. पण आम्ही कलाकार फक्त कॅमेऱ्यासमोरच अभिनय करतो, कॅमेऱ्यामागे आम्हीही माणूस असतो आणि प्रत्येक वेळी आम्ही अभिनय करत नसतो हे सांगण्यासाठीच मी रक्तदान करतानाचा फोटो शेअर केला, असे म्हणत तेजस्विनीने नेटीजन्सच्या मनातील शंका दूर केली.

सध्या कोरोनाचा वाढता कहर यामुळे प्रत्येक जण धास्तावलेला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन पुन्हा वाढला आहे. अनेकांचे काम थांबले आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यामुळे लोक लस घेण्यासाठी रांगा लावत आहेत. कलाकार हा आधी एक संवेदनशील माणूस असतो- हे वाक्य केवळ म्हणण्यापुरते नाही तर खरोखरच अनेक कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. लस घेतल्यानंतर रक्तदान करता येणे शक्य नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा अपुरा पडणार आहे. याच दृष्टीने सरकारी यंत्रणा रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहे. रक्ताची गरज, साठा आणि पुरवठा याचे गणित बिघडले तर नॉनकोरोना रुग्णांवरील उपचारात अडथळा येऊ शकतो. याची जाणीव आणि भान असलेल्या कलाकारांमध्ये तेजस्विनी पंडित आहे. म्हणूनच तिने दोन दिवसांपूर्वी रक्तदान केले. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये तेजस्विनीनं असं म्हटलं आहे की, समाजकारणाचा, समाजसेवेचा कधीच गाजावाजा करू नये, असं माझे बाबा म्हणायचे. आरशासमोर उभे राहून अभिमानाने आपली प्रतिमा पाहता आली पाहिजे असे कर्म आपले असले पाहिजे. मात्र आमच्यासारख्या कलाकारांनी काही मदत केली आणि ती सोशल मीडियावर शेअर केली की आम्ही ट्रोल होतो. आम्ही हे सगळं प्रसिद्धीसाठी करत असल्याचा ठपका आमच्यावर ठेवला जातो. पण आम्ही कलाकार हे नंतर कलाकार आहोत आणि आधी माणूस आहोत. माझे बाबा म्हणायचे ,की तुम्ही झाकल्या मुठीने मदत केली तर समाजात इतकी गरज असताना तुम्ही काहीच मदत करत नाही असे लोक म्हणतील. जर केलेली मदत दाखवली तर म्हणतील की तुम्ही पब्लिसिटीसाठीच हे काम केलं. आपल्या ऐपतीप्रमाणे केली तर इतकीच मदत का केली, असाही बोल ऐकावा लागतो. थोडक्यात काय तर बोलणारे बोलत राहणार. समाजकार्य करताना कॅमेरा घरीच ठेवायचा असतो, ही शिकवणदेखील मला माझ्या बाबांनी दिली. पण खरं सांगायचं तर जेव्हा लोक आम्हा कलाकारांकडून होणाऱ्या मदतीला पब्लिसिटी स्टंटचे लेबल लावतात तेव्हा खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच आजच्या डिजिटल युगात असे फोटो पोस्ट करावे लागतात.

तेजस्विनी आत्ता जरी यशस्वी अभिनेत्री आणि उद्योजिका असली तरी तिने खूप संघर्षमय आयुष्य व्यतीत केले आहे. ‘अग्गं बाई अरेच्चा’ या सिनेमातून तेजस्विनीने अभिनयात पदार्पण केले. आई अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्याकडून तिला अभिनयाचा वारसा मिळाला. एकेकाळी तिच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. लाईटचे बिल भरायला पैसे नव्हते म्हणून त्यांचे कनेक्शन कट केले होते. पण केवळ जिद्दीच्या जोरावर तेजस्विनी अभिनयात आणि सध्या फॅशन क्षेत्रात यशस्वी झाली आहे. अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांच्या बायोपिक सिनेमात तेजस्विनीने वठवलेली सिंधूताईंची भूमिका तिच्या अभिनय कारकीर्दीतील माइलस्टोन आहे. सध्या तेजस्विनी आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे यांचा एकत्रित ‘तेजाज्ञा’ हा फॅशन ब्रँड आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button