‘शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही कधीही केंद्राची वाट बघितली नाही”; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

CM Uddhav Thackeray-Devendra Fadnavis.jpg

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करायला हवी. विरोधी पक्षातील नेत्यांनीही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी आणि आर्थिक मदतीची मागणी करायला हवी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती. मात्र विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या मागणीला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच स्वगृही नागपुरात आले असतांना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना नवनियुक्त सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राकडे मदत मागणार असल्याचे म्हणाले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी नक्कीच केंद्राकडे मदत मागावी. मात्र आम्ही सत्तेत असतांना यापूर्वी राज्यातील बळीराज्यावर अनेक संकटे आली. मात्र आम्ही कधीही मदतीसाठी केंद्राची वाट बघितली नाही. शेतकऱ्यांना थेट मदत केली.

ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत करावी म्हटलं होतं. आता स्वतः उद्धव ठाकरे हे मुख्यंमत्री झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ हजार रुपये हेक्टरी मदत करावी.

केंद्राकडून जेव्हा निधी येईल तेव्हा ते राज्याच्या निधीत जोडावे. केंद्राची वाट बघत बसू नये. तात्काळ मदत करावी. आम्ही सुद्धा कधीही वाट बघत बसलो नव्हतो. असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

“४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाले”; अनंत हेडगे यांचा दावा