वसुंधरेचे आम्ही विश्वस्त ! ( भाग १)

Environment and pollution

फ्रेंड्स ! कुठलाही विषय आपण केव्हा मांडतो त्या लेखनाचे अनेक प्रकार जरी असले, तरी लिहितांना काही उद्देश असतो की, एक तर ते लिखाण कुठल्यातरी प्रश्नावर असतं, समस्येची ओळख करून दिलेली असते, तर दुसऱ्या प्रकारचे लिखाण हे त्या समस्येची उकल कशी करता येईल यासंबंधी मार्गदर्शन असते. आणि कधीकधी असाही प्रयत्न असतो की ,एखादी समस्या ,त्यावर सर्वत्र केले जाणार्या विविध उपाययोजनांची माहिती , आणि मग त्यावर चिंतन करून आपण या समस्येबाबत काय करू शकू हे विचारमंथन ! याचाच उपयोग मी या “पर्यावरण आणि प्रदूषण” या प्रश्नासंबंधी बोलताना करणार आहे.

दोन वर्षापूर्वी , मराठवाड्यामध्ये प्रचंड कोरडा दुष्काळ होता आणि त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र मात्र पावसाने झोडपल्या जात होता ,एकूणच काय आनंदी आनंद. त्यावेळच्या एका पेपर मधील संपादकीय ने लक्ष वेधून घेतले .त्यात लिहिलं होतं ,”दुर्गाबाईंना सुद्धा नवे ऋतुचक्र लिहावे लागेल अशी परिस्थिती या वर्षात दिसून आली. अगदी खरंच तो निसर्ग आणि ती नियती यांच्या आनंदी संसारातून वसंत फुलतो. यावर्षी मात्र दोघांमधील विसंवादाच्या झळांनी वसुंधरा अक्षरशहा: कोळपली आहे.

नुकत्याच झालेल्या लेसेंटच्या एका संशोधनानुसार, जगात 90 टक्के मुले ,डब्ल्यू एच ओ नेनिश्चित केलेल्या सुरक्षित सिमेपेक्षा जास्त प्रदूषणाचे पार्टिकल्स असणाऱ्या हवेत श्वास घेत आहेत. म्हणजेच 3.2 अब्ज मुले अस्थमा ,न्यूमोनिया यासारख्या आजारांनी ग्रासण्याची भीती आहे. पृथ्वीवरचा तापमान जेवढं वाढतं ते शोषल्या जातं आणि तेवढेच बाहेर फेकले जात ,त्यामुळे पृथ्वीचे तापमान उबदार राहते. पण प्रदूषणामुळे विविध वायूंचा थर वरती असल्याने तेथेच कोंडून तापमानात वाढ होते आणि होतच राहते .त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या वाढते. जगाच्या उष्णतामानात दहा वर्षाला अर्धा डिग्री सेल्सिअस एवढे सतत होणारी वाढ आहे. त्यामुळे त्यामागील कारणे शोधणे खूप आवश्यक आहे.

कोळसा पेट्रोलियम व नैसर्गिक वायू इत्यादी जैविक इंधनांचा वारेमाप उपयोग.

वनांची असाधारण नासधूस या कारणामुळे वातावरणात निरंतर कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढत चालले आहे.

ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळू लागला आहे .अंटार्टिकावर प्रदेशात पाण्यातील हिमखंडाचाभाग मोठ्या वेगाने वितळू लागल्या ,तर काही भागात तर जलाच्या आत असणाऱ्या बर्फाचा नव्वद टक्के एवढा बर्फ वितळून गेला आहे हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम.

मेलबोर्न युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर कोव्हीन वॉलश त्यांनी म्हटले की जगात ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ उत्पन्न होताना दिसतात, त्याला उष्णतामानातील बद्दलच कारणीभूत आहे.

याशिवाय काही तज्ञ आणि वैज्ञानिकांच्या मते फक्त निसर्गालाच नुकसान नसून वाढत्या उष्णता मानाने मानवाची सरासरी उंची कमी होण्याची शक्यता फ्लॉरिडा युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.

आणखीन एक दुष्परिणाम म्हणजे समुद्राचे पाणी जास्त प्रमाणात ऍसिडिक होऊ लागले आहे .असेच चालू राहिले तर त्या पाण्यात राहणाऱ्या 30% जातीचे प्राणी व जीवजंतू या शतकाअखेर नष्ट होतील इंधनाचे सतत जलन होत असल्यामुळे जेवढा कार्बन-डाय-ऑक्‍साईड उत्सर्जित होतो, त्याचा मोठा भाग समुद्र शोषून घेत असतो .त्यामुळे हे पाणी आम्लयुक्त होते आहे. याचा एक आजच दिसणारा परिणाम म्हणजे पोवळ्यांचे डोंगर सारखे झीजू लागले आहे.

ज्या नद्यांमुळे मानव सभ्यता ,मानवी संस्कृती निर्माण झाली. त्याच मानवाच्या अनियंत्रित विकासाच्या धुंदी मुळे व अनियंत्रित औद्योगिकरणामुळे मानव नद्यांकडे फक्त एक संसाधन म्हणून बघतोय. आत्यंतिक प्रदूषण व उपसा यामुळे कानपूर जवळील पांडू नदी लुप्त होऊ पाहतेय, तर उत्तराखंडातील गवलनदी हलद्वानीच्या जवळ जाऊन दगड ,वाळू यांची खाण म्हणून उपयोगात आणली जावू लागलीये. सहारनपुर जिल्ह्यातील मोठ्या साखर कारखान्यांमुळे कृष्णा नदी विषारी होऊ पाहते. अनेक नद्यांचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करायचे ते सर्व टाकाऊ वस्तू, रंगीत मुर्त्यांचा विसर्जनातून प्रदूषित होतेय.

प्लास्टिकच्या पिशव्यांचा अनिर्बंध वापर ! अत्यंत निकृष्ट दर्जाचे केमिकल्स वापरून केल्या जाणाऱ्या पॉलिथिनचा वापर आणि या बनवण्यासाठी युरिया, क्लोराईड, झिंक, लेड, मीथाईल, ए क्रिमेलाईड, पोलीइथेन या सारख्या घातक भयंकर रसायनांचा वापर होतो. याच पिशव्यांना रंगीत करण्यास क्रोमियम, शिस, पेरियम, तांबे यांचा वापर ही प्राणीमात्रांना खूप घातक आहे. प्लास्टिसायझर व पॉंलीस्ट्रोल मनुष्याच्या मेंदूला ,यकृताला व प्रजनन तंत्राला प्रभावित करतात, त्यावर त्यांचा दुष्परिणाम होत असतो ,असेही काही तज्ञ लोकांचे मत वाचण्यात आले. या पिशव्या नाले ,नद्यांमध्ये फसतात. गाई गुरांच्या पोटात जातात .त्यांचे दुध तर विषारी होतेच ,पण त्याचे प्रमाण वाढल्यास त्यांना अकाली मृत्यू येतो. असा कचरा असणारी जमीन त्याचे खत होत नसल्याने केवळ ओसाड बनते . यांचे ज्वलन जर झाले तर निघणारे वायू विषारी असून ते कॅन्सर, हृदयरोग, त्वचा व श्वासरोग वाढवतात.

या आणि अशा अनेक पातळ्यांवर प्रदूषण होत असताना आपण मात्र हाताची घडी घालून मख्खपणे बसावे हे आपल्या संस्कृतीला देखील पटणारे नाही .फक्त सरकारने असे करायला हवे ,तसे करायला हवे आणि आम्ही त्यांना निवडून दिलं की आमचं काम झालं, आता काम लोकप्रतिनिधींच ! असं म्हणून कसं चालेल ? आपल्याला साधं आपलं घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सांभाळताना , मदतीला असणारी माणसं सांभाळतांना नाकी नऊ येतात. तर देश किंवा शहर सांभाळत सोप कसं असेल ?

मध्यंतरी एक बघितलेला व्हिडिओ खूप आवडला. बेल वाजते तेव्हा हा मुलगा आईला सांगतो , की “कचरेवाला आया है !”तेव्हा हा आई म्हणते की,”अरे ! कचरेवाला मत कहो ! कचरे वाले तो हम है, कचरा हमनेही तो किया है !”आणि हेच या समस्येचे उत्तर मला वाटतं .फार काही समाज सेवा, प्रकल्प वगैरे करायची गरज नसते. दिवसाच्या सुरुवातीपासूनच जर “मनाचा पोलीस” आपल्यासाठी उभा केला तर ! सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे दुर्गाबाईंना जर नवीन ऋतुचक्र लिहावं लागलं तर त्या ते नक्की उलट फिरवतील याची मला खात्री आहे मागे वळून पाहिलं तर आपल्या संस्कृतीत या सगळ्यांना उत्तर आहेत आणि दररोजच्या दैनंदिनीत स्थानही !

मुळातच या वसुंधरेचे ऋण म्हणून आपण सकाळी उठल्यावर जमिनीला स्पर्श करण्यापुर्वी” पादस्पर्श क्षमस्व मी ! “असं म्हणण्याची पद्धत आहे .म्हणजेच मी माझ्या पायाने जमिनीला स्पर्श करत आहे, याबद्दल क्षमा मागायची .कृतज्ञता व्यक्त करायची .त्याच बरोबर “कराग्रे वसते लक्ष्मी” जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी लक्ष्मी आणि सरस्वती यांचे स्मरण करून, ते करताना आपले दोन्ही हात एकमेकांना जुळलेले असतात .या हातांच्या मदतीने मी जे काही काम करणार आहे ,म्हणजे कष्ट करणार आहे त्यासाठी स्मरण करायचे असते. पूर्वी दररोज स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी चुलीला किंवा गॅसच्या शेगडीला हळदी कुंकू लावण्याची पद्धत होती. ती म्हणजे अग्नि देवाची पूजा आणि कृतज्ञता होय.

तुळशीला फेऱ्या आणि पूजा ही ,”ऑक्सीजन हब “ची आठवण करून देते. तर पानाच्या शेजारची चित्राहुती किड्या मुंग्यांची आठवण मनात जागृत ठेवते. विदुषी आणि समाजसेवक, लेखक सुधा मूर्ती यांनी आपल्या एका आठवणीत सांगितले आहे की सगळी झाडावरची कणस काढल्यानंतर शेंड्यावर काही कळस जाणीवपूर्वक झाडावरच राहू द्यायची असं त्यांची आजी सांगत असे, ही एक प्रकारची पक्ष्याप्रती असणारी कृतज्ञता होती. आज मात्र आपल्याला हे सगळं बाष्कळ वाटतंय, पण ते विचारात घेण्यासारखा आहे.

कुठे ती आपल्या संस्कृतीतली कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत ,निसर्गाप्रतीची ओढ आणि कुठे आपली सगळं काही ओरबाडून घेण्याची आत्ताची मनोवृत्ती ! किती विरोधाभास आहे यात ! काय करता येईल यासाठी आपल्याला ? याचा विचार नेहमीच मनात असतो. प्रश्न तिथे उत्तर, इच्छा तिथे मार्ग, आणि कल्पकता तिथे कल्पना ! या पद्धतीने आपल्याला नक्कीच अनेक उपाय यावर दिसतील ,सापडतील याचा वेध घेण्याचा प्रयत्न करूया उद्याच्या लेखात ! त्याचबरोबर आज अनेक जण यासाठी कार्य करतात आहे ,त्यांच्याही कार्याचा आढावा आपल्याला घेता येईल. आता जगभरातल्या तरुणी यासाठी पुढाकार घेतात आहे ? काय म्हणतात आहे त्या ? आणि ह्या सर्वत्र करण्यात येणाऱ्या उपायांचा वापर करून आपण काही करू शकतो का. यावरही आपण विचार करू ?

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER