‘आमी आत्महत्या करायला तयार हाव’, शेतकऱ्यांची व्यथा ऐकून संभाजीराजे भावुक

लातूर: ‘आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो काय, जगावं कसं बगा आमी?’ बळीराजाची ही व्यथा ऐकून हृदयाचा ठोका चुकल्यासारखं वाटलं, अशी भावना खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी व्यक्त केली आहे. संभाजीराजे काल लातूर जिल्ह्यातील निलंगा परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. यादरम्यान हतबल शेतकऱ्यांची व्यथा ऐकून संभाजीराजे भावुक झाले. त्यांनी याबाबत पोस्ट लिहून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली.

“आमी आत्महत्या करायला तयार हाव…आवो काय, जगावं कसं बघा आम्ही ?”…पलीकडं उभ्या असलेल्या शेतकरी कुटुंबाचे शब्द ऐकले, अन माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला की काय असं वाटून गेलं. काय बोलावं हेच क्षणभर सुचेनासे झाले. तेरणा नदीने आपली वाट बदलली आहे. कर्नाटक सीमेलगत असलेल्या बोरसुरी गावच्या शिवारातून जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालत जाऊन या केटी बंधाऱ्यावर आम्ही पोचलो. तेरणा नदीने आपली वाट बदलली आहे. पलीकडे सोनखेड गावचे शेतकरी वाहून गेलेल्या शेताकडे बघत बसलेले दिसले. आम्हाला जवळ आलेले बघून त्यांनी आर्त हाक दिली आणि व्यथा मांडायला सुरुवात केली.होतं तेवढं सगळं शेत पाण्याबरोबर वाहून गेलं आहे. पिकाबरोबर मातीसुध्दा वाहून गेल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. आम्ही त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला. आत्महत्या करू नका. मुख्यमंत्री, देशाचे कृषी मंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यांना भेटून तुमची व्यथा सांगून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

माझी सरकारला विनंती आहे की, नदीच्या काठावरच्या किंवा ओढ्याच्या काठावरच्या शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे लवकर करून घ्यावेत. माती वाहून गेलेल्या किंवा नदीचे बदललेले पात्र यावर विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER