‘कराची’ नावावरून शिवसेनेत संभ्रम? नांदगावकरांची ‘ती’ भूमिका पक्षाची नाही – राऊत

Sanjay Raut

मुंबई : मुंबईत ‘कराची स्वीट्स’ नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्या दुकानदाराला शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी दुकानाचं नाव बदलण्याची मागणी केली. यावर भाष्य करताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कराची स्वीट्सचं नाव बदलण्याची मागणी निरर्थक असल्याचं म्हणत ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या विषयावर शिवसेनेत संभ्रम आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्समध्ये जाऊन दुकानमालकाकडे नाव बदलण्याची मागणी केली. ‘मला कराची शब्दाचा तिरस्कार वाटतो. कारण ते पाकिस्तानातलं शहर आहे. मी तुम्हाला काही वेळ देतो. तुम्ही दुकानाच्या नावात बदल करा’ असं नांदगावकर यांनी दुकानाच्या मालकांना सांगितलं. त्यावर आमचे पूर्वज पाकिस्तानातून भारतात आले होते, असं उत्तर मालकांनी दिलं. यानंतर नांदगावकरांनी तुमचं इथं स्वागतच आहे. पण तुम्हाला दुकानाचं नाव बदलवाच लागेल. तुम्ही हवं तर तुमच्या पूर्वजांचं नाव दुकानाला द्या, असं मालकांना ठणकावून सांगितलं.

या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘कराची बेकरी आणि कराची स्वीट्स ६० वर्षांपासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी कुठलाही सबंध नाही. निर्वासित सिंधी-पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.’ असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हणत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER