चौकश्याला आम्ही घाबरत नाही : चंद्रकांत पाटील

सांगली :- जेवढ्या चौकश्या लावायच्या तेवढ्या लावा, आम्ही झोपेतही योग्यच निर्णय घेतो. त्यामुळे चौकश्यांना आम्ही घाबरत नाही, या चौकश्यांचे अहवाल त्वरीत घ्या. केवळ चौकश्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे किंवा विकासकामे रखडवू नका, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारला दिला.

शरद पवारांचे वक्तव्य हिंदू-मुस्लिमांत तेढ निर्माण करणारे : विहिंप

तसेच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवड आणि नुकत्याच झालेल्या महापौर, उपमहापौर निवडीच्यावेळी पक्षांतर्गत समोर आलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शुक्रवारी आढावा घेतला. कोअर कमिटीच्या सदस्यांची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, प्रदेश उपाध्यक्ष निता केळकर, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारने जनादेशाचा अनादर केलेला आहे. निवडणुक एका पक्षाबरोबर लढवायची आणि सत्तेत जाताना दुसर्‍याच पक्षाने बरोबर घ्यायचे, असा प्रकार आजपर्यंत कुठे बघायला मिळाला नाही. अशा प्रकारे जनादेशाचा अनादर करणार्‍या सरकारचा दुसरा कार्यक्रम म्हणजे आगोदरच्या सरकारच्या निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावणे. फसवी कर्जमाफी आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ, विघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, याविषयी भाजपने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. दि.25 रोजी राज्यात तालुकास्तरावर चारशे ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडी सरकारवर सडकून टिका करताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अभिनंदनही केले. दोन भाऊ भांडून वेगळे राहिले म्हणून त्यांच्यातील भावनिक संबध संपत नाही. अशा भावनेतूनच ठाकरे यांनी मोदींची भेट घेतली आहे.