कोरोना विरोधातील लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सेनापती, हे युद्ध आम्ही नक्कीच जिंकू – संजय राऊत

मुंबई : देशातील सर्वच पक्ष संघटना एकत्र येत कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरले आहेत. या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सेनापती आहेत, आम्ही सर्व मिळून हा लढा नक्कीच जिंकू, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या लढ्याला समर्थन दिले आहे. पंतप्रधान मोदींसोबत बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपली भूमिकास्पष्ट केली.

कोरोनाग्रस्तांची देशातील वाढलेली संख्या लक्षात घेता येत्या काळात लॉकडाऊन आणखी काही काळापर्यंत वाढवण्यात येण्यात असल्याचे संकेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र या आधी ते सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राऊत यांनी वृत्तवाहिन्यांची बोलताना आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी देशातील जनतेच्या हितासाठी म्हणून स्वतः समोर येऊन तपासणी करुन घ्यायला हवी. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात योग्य ताळमेळ असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकत्र लढून आपण ही लढाई जिंकूच असा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.


Source-ANI