मराठा आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध, वेळ पडल्यास पंतप्रधानांना भेटू; अजित पवारांची ग्वाही

Ajit Pawar on Maratha Reservation - Maharashtra Today

पुणे : राज्य सरकारने लागू केलेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने धक्कादायक निकाल दिला आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. वेळप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिली.

अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना अनेक विषयांवर भाष्य केले. मराठा आरक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या वकिलांची फौज ठेवली होती तीच फौज कायम ठेवण्यात आली होती; मात्र असं सांगतानाही सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेला निर्णय अतिशय धक्कादायक आहे. मात्र महाविकास आघाडीचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास वचनबद्ध आहे. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. मात्र आरक्षणासाठी आवश्यकता पडल्यास एक दिवसाचं अधिवेशन घेऊन एक ठराव मांडण्यात येईल. वेळ पडल्यास सर्व पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

यावेळी त्यांनी कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यावरून अजित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आपल्याकडील जनतेचं लसीकरण अद्याप झालेलं नसतानाही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहे. केंद्राचा लस निर्यातीचा निर्णय चुकला. याचा मोठा फटका जनतेला बसतोय, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली. ४५ वयोगटाच्या पुढील नागरिकांना लस देणं गरजेचं आहे. मात्र, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात अडथळा येत आहे. लस नसल्याने ही अडचण निर्माण होत आहे. केंद्र सरकारला लस स्वस्तात मिळत आहे. राज्यांना मात्र महागड्या दरात लस मिळत आहे, असं सांगतानाच मी येथे आल्यावर अदर पूनावाला यांना फोन लावला.

अजून १० ते १२ दिवस ते परदेशात असतील असं सांगण्यात आलं आहे. तेथील क्रमांक मिळवून  संपर्क साधण्याचा प्रयत्न असेल, असं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं सांगितलं. पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी भूमिका जाहीर करत लॉकडाऊनचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात भिरकावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button