पोलिसांच्या खुलाशानंतर मेहबूब शेख समर्थनार्थ रोहित पवार मैदानात

Rohit Pawar - Mahebub Shaikh

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र, शेख यांनी हा आरोप स्पष्टपणे फेटाळला. तसेच औरंगाबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तरुणी आणि मेहबूब यांचा संपर्क नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबूब यांच्या समर्थनार्थ आमदार रोहित पवार मैदानात उतरले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रथमच या प्रकरणी सविस्तर भूमिका मांडली आहे. मागील एक वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती पोलिसांनीच समोर आणलीय. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेऊ नये, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपला सुनावलं आहे.

प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभं असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाईही झालीच पाहिजे; पण महेबूब शेख व संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केलाय. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करु नये, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या भाजपवर जोरदार शरसंधान साधलं आहे. एखाद्याचे चारित्र्यहनन करून आसुरी आनंद लुटणाऱ्यानो, हाथरस प्रकरणात तुमचे तोंड शिवले होते का रे? असा सवाल करत भाजपवर जोरदार टीका केलीय. तुमच्या अनेक आमदार-खासदारांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. जेव्हा काढू तेव्हा तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा देत हिरव्या देठाची भाषा महाराष्ट्र विसरला नसल्याचं मिटकरी म्हणाले.

पोलीस काय म्हणाले?
मागील एक वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर आलीय. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील एक वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केलाय. औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी तीन पथकं तयार केली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER