एनआयएच्या कोठडीत वाझेचा मुक्काम वाढला, ३ एप्रिलपर्यंत वाढ

Waze - NIA - Maharastra Today

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा मुक्काम वाढला आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने वाझेच्या कोठीडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे वाझे याला पुढचे ९ दिवस एनआयएच्या कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे.

सचिन वाझेला यापूर्वी एनआयएने १४ मार्च रोजी विशेष कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला २५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली होती. आज वाझेची कोठडी संपत असल्याने पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाझेच्या कोठडीत नऊ दिवसांची म्हणजे ३ एप्रिलपर्यंत वाढ केली.

यावेळी एनआयएने कोर्टाकडे अत्यंत धक्कादायक माहिती सादर केली. वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून ३० जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. ३० पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र २५ काडतुसे मिळाले नाहीत. ही २५ काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने कोर्टाला दिली.

एनआयएने यावेळी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं एनआयएने कोर्टाला सांगितलं. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली. त्याशिवाय वाझेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. तसेच वाझेच्या गाडीतून मिळालेले पुरावे फोरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत. शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने १२ लाख रूपये दिले होते. त्याचीही माहिती घ्यायची असल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं आहे. याशिवाय वाझेच्या आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोर्टाला दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER