वाझेच्या नियुक्तीबाबत पवार, देशमुख आणि राऊतांशी चर्चा केली होती, अबू आझमींचा गौप्यस्फोट

Abu Azmi - Maharastra Today
Abu Azmi - Maharastra Today

नागपूर: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी निलंबित सहायक निरीक्षक सचिन वाझेंबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. वाझेला पुन्हा सेवेत घेणार असल्याची माहिती मिळताच मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना वाझेंना पोलीस दलात घेऊ नका, अशी विनंतीही त्यांना केली होती, असा गौप्यस्फोट अबू आझमी यांनी केला आहे.

नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी वाझे याच्या नियुक्तीवरून सरकारवर टीका करतानाच या सर्व प्रकाराला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगच जबाबदार असल्याचेही स्पष्ट केले. वाझेला पोलीस दलात पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळताच मी पवार, राऊत आणि देशमुखांना भेटलो होतो. पण परमबीर सिंग यांनी या दोघांना असा काय सल्ला दिला की त्यांना पोलीस दलात घेण्यात आलं, असं आझमी म्हणाले. वाझेंना घेऊ नये म्हणून मी आंदोलनही केलं होतं, असंही ते म्हणाले.

ख्वाजा युनुस हत्येची केस सुरू असतानाही वाझेला पोलीस दलात घेणं ही महाविकास आघाडीची सर्वात मोठी घोडचूक होती. तसेच मी सत्तेत असूनही सांगतो की, ज्या दिवशी वाझेचा विषय विरोधकांनी हातात घेतला, त्याच दिवशी त्यांना निलंबित करायला हवं होतं. पण वाझेला निलंबित करण्यात आलं नाही, ही सरकारची दुसरी मोठी चूक होती, असंही त्यांनी सांगितलं.

वाझेंचे कॅरेक्टर पहिल्यापासून वाईट आहे. त्याला परमबीर सिंग दोषी आहेत. पैसे वसुली प्रकरणात सिंग यांनाच जबाबदार ठरवलं पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी जर अधिकाऱ्यांना पैसे वसुलीचं टार्गेट दिलं होतं. तर सिंग यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना का सांगितलं नाही. सिंग यांनीच पैसे वसुली केली आहे. त्यांच्याविरोधात पैसे वसुलीच्या अनेक केसेस सुरू आहेत, असा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button