लहरी पाऊस आणि दौऱ्यांच्या लहरी…

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray.jpg

Shailendra Paranjapeमुसळधार पावसानं हाहाःकार माजवलाय आणि अगदी उसासारखं कोणत्याही विपरित परिस्थितीत ताठ मानेनं उभं राहणारं पीकही आडवं व्हायची वेळ आलीय. दुष्काळ असो की अतिवृष्टी, करोना असो की स्वाइन फ्लू, सर्व विषयात राजकारण येणं अपरिहार्य झालंय की काय, अशी आज स्थिती आहे.

दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली की मंत्र्यांचे मग मुख्यमंत्र्यांचे आणि विरोधी पक्षनेत्यांचेही दौरे सुरू होतात. आताही तेच होणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करणार आहेत तशीच ती विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही करणार आहेत.

करोनासंदर्भात आरोग्ययंत्रणा कोलमडून पडल्याचे किंवा मुळात ती तितकीशी सक्षम नसल्याचेच दिसून आले आहे. तीच गोष्ट भूकंप, महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा कोणतेही संकट संपूर्ण समाजावर येते तेव्हा ऐन कसोटीच्या क्षणी सगळे राजकारणी गायब झालेले असतात, हाच पब्लिकचा अनुभव आहे. पावसानं जरा विश्रांती घेतली की यांचे दौरे सुरू होतात आणि मग वर्षानुवर्षे माध्यमांमधून म्हणजे पूर्वी पेपरमधून आणि आता टीव्हीच्या बाईट्समधून तीच स्टिरियो टाइप विधानंही येऊ लागतील.

मुळात करोनासंदर्भात याच लेखमालेतून विकेंद्रित आरोग्य यंत्रणा आणि सुविधा उभारण्याचा आग्रह आम्ही धरत आहोत. तीच गोष्ट एकूणच गव्हर्नन्सची. संसदीय लोकशाहीत म्हणजे पार्लमेंटरी डेसोक्रसीमधे संपूर्ण शासनयंत्रणा तशा अर्थाने रचनेत विकेंद्रित असतेच. पण कारभार करताना मात्र अधिकारांचे केंद्रीकरण होत गेल्याने तथाकथित स्टील फ्रेम असलेल्या नोकरशाहीच्या हातात कारभार सोपवला गेलाय. त्यामुळे अधिकारी सांगतील ती माहिती, अशी स्थिती आहे.

संगणक क्रांतीनंतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा लाभ घेऊन उपग्रह प्रतिमा, छायाचित्रं यांचा फायदा घेऊन पेरणीची, पिकांची माहिती ठेवणं शक्य आहे. त्यारोबरच घरांची, आस्थापनांची आधीची आणि संकटानंतरची स्थिती हेही अचूकपणे नोंदवणे शक्य आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि मालमत्ता नुकसानीचा आढावाही अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेतला जायला हवा.

वर्षानुवर्षे त्याच त्या घिस्यापिट्या नजर अणेवारीसह मानवी हस्तक्षेप असलेल्या पद्धती मोडीत काढायला हव्यात. वास्तविक, एकीकडं चंद्रावर स्वारी करायला सिद्ध झालेला आपला देश महानगरांमधे सीसीटीव्हीचं जाळं उभारत असेल तर खेडोपाडी पसरलेल्या शेतकरी नावाच्या अन्नदात्याच्या शेताची, पिकांची माहितीही फिंगरटिपवर म्हणजे संगणकाच्या एका कळीच्या सहाय्याने का मिळवू शकत नाही. तसं झालं तर हे मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधकांचे दौरे आणि त्यातले राजकारण या साऱ्यालाही फाटा मिळू शकेल.

या दौऱ्यांमागचे कारण सांगताना वर्षानुवर्षे असे सांगितले जाते की मुख्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री किंवा विरोधी पक्षनेते दौऱ्यांवर गेले की लोकांची अवस्था काय आहे, नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे समजू शकते. त्याबरोबरच लोकांना धीर देता येतो. नेत्यांना भेटल्यानंतर धीर मिळण्याचे दिवस केव्हाच इतिहासजमा झालेत आणि याचे भान सर्वाधिक यायची गरज आहे, ती नेतेमंडळींना.

करोनामुळं सगळंच ऑनलाइन होत असताना आणि मुख्यमंत्र्यांच्याही जवळपास सर्व बैठका, कार्यक्रम ऑनलाइ वा व्हिडियो कॉन्फरन्समधून होताहेत. अतिवृष्टीनंतरही मुख्यमंत्र्यांनी व्हीसी म्हणजे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त तसंच विविध जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक घेतलीच आहे. तरीही ते प्रत्यक्ष पूरस्थिती अतिवृष्टी झालेले भाग बघायला बाहेर पडताहेत, हे निश्चितच चांगले लक्षण आहे. पण ते बाहेर पडताहेत ते केवळ प्रकाश आंबेडकर यांनी तशी मागणी केलीय म्हणून असेल, तर त्यानं लोकांना दिलासा नक्कीच मिळणार नाही. केवळ फडणवीस यांनी दौरा जाहीर केला म्हणून मुख्यमंत्री बाहेर पडणार असतील, तर त्यानंही दिलासा मिळणार नाही कारण राजकारण नक्कीच होईल पण त्यातून लोकांच्या हाती काही लागेलसं वाटत नाही.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER