लातूर जिल्ह्यात 62 गावांना 64 टँकरद्वारे पाणीपुरवठा

(प्रतिनिधी) लातूर : लातूर जिल्ह्यात मे महिन्यात ऊन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही वाढत आहे.आजघडीला जिल्ह्यात ४९ गावे आणि १३ वाड्या अशा 62 लहान-मोठ्या गावांमध्ये ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर ४८७ गावांसाठी ६०३ जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पत्रकार परीषदेत दिली.

जी. श्रीकांत पुढे म्हणाले की निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त असल्यामुळे त्या कालावधीत पाणीटंचाईकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. मात्र त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही बैठका घेतल्या. त्यातून गावपातळीवरील अडचणी समोर आल्या. त्यावर तेथेच निर्णय घेऊन अधिग्रहण आणि टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतले.

उविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी गावातून मागणी येताच पाणीटंचाईची पाहणी करतील. तातडीने अहवाल पाठवतील आणि अधिग्रहण किंवा टँकर अशी जी गरज असेल ती भागवण्यात येईल. एक-दोन गावांमध्ये विहिरीत उतरून पाणी घेतले जात असल्याचे समोर आले होते. परंतू तेथे तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. पाण्याच्या टाक्या बसवून टँकरच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. याच वेगाने ऊन्हाची तीव्रता वाढती राहिली तर येत्या काही दिवसांत 150 टँकर लावावे लागतील. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला तर मात्र पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी होऊ शकते. दरम्यान, टंचाईची तीव्रता पाहून काही टँकरचालक जादा पैसे उकळत असल्याच्या तक्रारी काही लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. त्यावर कारवाई करण्यात येणार असून जादा पैसे घेणारे टँकर आपत्ती कायद्यातील तरतुदीचा वापर करून जप्त करण्यात येतील, असा ईशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे