नागपूरकरांना दोन वर्षे पुरेल इतका तोतलाडोह धरणात पाणी साठा

totladoh-now-full

नागपूर :- मान्सूनचे तब्बल दोन महिने कोरडे गेल्यांनतर गेल्या अवघ्या दोन महिन्यात पावसाने आपला बॅकलॉक भरून काढला आहे. जवळपास सर्वच जलाशयात मुबलक पाणीसाठा आहे. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणारे तोतलाडोह, पेंच, गोरेवाडा, अंबाझरी यासह इतर जलाशय १०० टक्के भरली आहेत.

तोतलाडोह सिंचन प्रकल्प २०१३ नंतर पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच १ हजार ०१७ दलघमी म्हणजेच १०० टक्के भरला आहे. मृतसाठ्यातून नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या प्रकल्पातून आता पुढील दोन वर्षे पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यासोबतच एक लक्ष चार हजार हेक्टर क्षेत्रालाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्प पूर्ण भरल्यानंतर १४ गेटमधून सरासरी १०० दलघमी एवढे पाणी या प्रकल्पातून पेंच नदीत सोडण्यात आले आहे.

तोतलाडोह पेंच जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प असून मागील पाच वर्षांपासून अनियमित पावसामुळे या प्रकल्पामध्ये जलसाठ्यात कायम तूट निर्माण झाली होती. मध्यप्रदेश शासनाने मागील वर्षी पेंच डायव्हरशन हा चौराई येथे प्रकल्प बांधल्यामुळे या प्रकल्पात येणारा प्रवाह खंडित झाला. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे चौराई प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे तब्बल पाच ते सहा वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सध्या तोतलाडोह प्रकल्पात १०१६.८७६ दलघमी एवढा जलसाठा निर्माण झाला आहे. त्यासोबत ३४.९०० दलघमी एवढी पाण्याची आवक सातत्याने सुरू आहे. तोतलाडोह प्रकल्पातून नागपूर शहराला १७० दलघमी पाणी आरक्षित असून पेंच प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची सुमारे एक लक्ष चार हजार हेक्टर क्षेत्रासाठी ७०० दलघमी तसेच कोराडी व खापरखेडा या थर्मलपॉवर स्टेशनसाठी ६० दलघमी पाणी आरक्षित आहे.

मागील वर्षी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडला होता. तसेच चौराई प्रकल्पातून पाणी न सोडल्यामुळे नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकल्पात असलेल्या १५० दलघमी मृतसाठ्यातून ९० दलघमी पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आला होता. त्यामुळे जलविद्युत निर्मितीसुद्धा थांबविण्यात आली होती. ती आता पूर्ण क्षमतेने सुरू राहील.

मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे चौराई तसेच तोतलाडोह प्रकल्पसुद्धा पूर्ण क्षमतेने भरला असून १६ ऑगस्टपासून सरासरी १०० दलघमी पाणी पेंच नदीत सोडण्यात आले आहे. तसेच पेंच प्रकल्पसुद्धा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतीला सिंचनासाठी पाणी देणे सुलभ होणार आहे.