मराठवाड्यात पाणी साठवणूक, समन्यायी पाणी वाटप आवश्यक : राजेश टोपे

_तज्ज्ञांच्या उपस्थितीत पीक-पाणी परिषदेत मंथन_

औरंगाबाद :- मराठवाड्यात पाणी साठवणूक व्यवस्था, समन्यायी पाणी वाटपाची आवश्यकता आहे. येथील आर्थिक, भौगोलिक अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक निधीसाठी आपणही आग्रही असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त करत परिषदेस शुभेच्छा दिल्या. शहरातील एका हॉटेल मध्ये आयोजित पीक पाणी परिषदेच्या ‘मराठवाडा विभागातील पाणी प्रश्न मंथन आणि दिशा’ यावर श्री. टोपे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, परिषदेचे संयोजक चंद्रकांत खैरे, औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, अर्जुन खोतकर, कल्याण काळे, जल तज्ज्ञ एच.एम. देसरडा उपस्थित होते.

ठाणे पालिका आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा महिला नगरसेवकांनी केला निषेध

मंत्री श्री.टोपे म्हणाले, या परिषदेतून पाण्याबाबत जनजागृती होईल. मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर जिल्हे पर्जन्यछायेतील जिल्हे आहेत. त्यामुळे येथे पर्जन्यमान कमी आहे. त्यातून पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, उद्योगासाठी पाणी यांचे दुर्भिक्ष येथे आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यातील धरणे पूर्णतः दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. कृष्णा खोरे, विदर्भातून, पश्चिम वाहिन्यांमधून मराठवाड्याला पाणी उपलब्ध व्हावे. तसेच या प्रश्नावर उपाय म्हणून पाण्याच्या साठवणूक व्यवस्थेची आवश्यकता आहे. कृष्णा खोरेच्या धर्तीवरच अधिक जास्त पाण्याची व्यवस्था मराठवाड्यात करावी लागेल. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शेती, उद्योगाचाही विचार व्हायला हवा. यासाठी वितरिका व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. चाऱ्या, पोट चाऱ्या, कॅनॉल दुरुस्ती कार्यक्षमपणे होणे आवश्यक असल्याचे श्री. टोपे म्हणाले. पाण्याचा पुनर्वापर, जलसाक्षरता, जलसंवर्धन, ठिबक सिंचनाचा बंधनकारक वापर करून पाण्याचा योग्य पद्धतीने वापर होण्यासाठी प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही श्री. टोपे यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री खोतकर यांनी ‘पायथा ते माथा’ धरणे भरण्यात यावीत, यासाठी लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात आग्रही राहावे, असे मत मांडले. तर श्री. काळे यांनी या परिषदेतून सर्वसमावेशक असा परिपूर्ण अहवाल तयार करण्यात येऊन येथील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी सोबत असल्याचे सांगितले. सुरुवातीला मान्यवरांनी छत्रपती शिवराय, स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व. गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मराठवाड्यातील सर्व नद्यांचे जलपूजन करून परिषदेस सुरुवात झाली.

*तज्ज्ञांच्या उपस्थितीत मंथन*

पहिल्या सत्रात जल तज्ज्ञ सर्वश्री. देसरडा, प्रदीप पुरंदरे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, सुहासिनी पौळ, उदय देवळाणकर यांनी विचार मांडले. श्री. पुरंदरे यांनी मराठवाड्यातील तपमान वाढ आणि वाळवंटीकरण यावर सादरीकरण केले. श्री. देशमुख यांनी एकात्मिक जल व्यवस्थापन आराखड्याचा शासनाने अभ्यास करून पाणी वाटप करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. देवळाणकर यांनी ‘मराठवाड्याच्या पावसाचा इतिहास’ यावर मार्गदर्शन केले.