चिपळुणातील मच्छी मार्केट व नाईक पुलाजवळ पाणी साचले

Water near the Chiplun fish Market and Naik Bridge

रत्नागिरी/प्रतिनिधी :- चिपळूण शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने शहरातील मच्छी मार्केट, नाईक पुलाजवळ पाणी साचले आहे. गुरूवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने वाशिष्ठी व शिव नदीच्या पाण्याच्या पातळी सहा मीटरपेक्षा जास्त वाढल्याने वाशिष्ठी नदीच्या पुलावरील वाहतूक सायंकाळनंतर बंद करण्यात आली होती. ही वाहतूक गुहागर बायपास मार्गे वळवण्यात आली आहे.

चिपळूण तालुक्यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातील काही भागात पाणी साचले आहे. घरांवर झाडे पडून नुकसानीच्या घटना सुरू आहे. मुंडतर्फे चिपळूण येथील सरिता श्रीराम सावंत यांच्या घराचे अंशत: ५ हजार ७१५ रुपयांचे नुकसान झाले आहे, अलोरे येथील विनोद सुर्वे यांच्या शेजारी भिंतीला भेगा पडल्याने नुकसान झाले आहे. ताम्हणमळा, देऊळवाडी शेती पाण्याचा व पिण्याचा डुऱ्याचा बांधदरड कोसळून पूर्णपणे बंद झाला आहे. सरासरी ११०.६६ मि.मी. तर आज अखेर एकूण सरासरी १४३१.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळनंतर पावसाने पुन्हा जोर धरला त्यामुळे वाशिष्ठी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.