कोल्हापुरातील कचऱ्यातील प्लॅस्टिकचा रस्त्यासाठी वापर

waste plastic use for construct Road in Kolhapur

कोल्हापूर : प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून डांबरी खडी तयार करण्याचा प्रकल्पाला रविवारपासून सुरुवात झाली. महापालिकेच्यावतीने अवनि संस्थेने तयार केलेल्या डांबरी खडीचा वापर संभाजीनगर येथील पॅचवर्क कामासाठी वापर केला. प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पामुळे शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याबरोबरच शहर प्लास्टिकमुक्त होण्याकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे मानले जात आहे.

ही बातमी पण वाचा:- कोल्हापुरात लागले खड्ड्यांचे लग्न

शहरात दैनंदिन सुमारे १८० टन कचरा संकलित केला जातो. त्यामध्ये सुमारे दहा ते १२ टन प्लास्टिकचा समावेश असतो. प्लास्टिकच्या वापरांमुळे प्रदूषणामध्ये भर पडत आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून अवनि संस्थेने प्लास्टिकपासून डांबरी खडी तयार करण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन देऊन परवानगी मागितली होती. त्यानुसार रविवारपासून प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यास संस्थेमार्फत सुरुवात झाली.

शहरातील रस्त्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. शहरवासियांना खड्डेमय रस्त्यांतून दिलासा देण्यासाठी पॅचवर्कचे काम हाती घेतले आहे. महापालिकेचा डांबरी प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने त्यावर मर्यादा येत आहेत. यावर उपाय म्हणून प्लास्टिकपासून डांबर खडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते. कोकणातील रस्ते याच पद्धतीने तयार केले जात असल्याने त्याच पद्धतीचे शहरातील रस्ते तयार करण्याचा प्रयत्न सुरू होते. त्यासाठी अवनि संस्थेने पुढाकार घेतला. महापालिकेने सुमारे अडीच लाख किंमतीचे प्लास्टिक श्रेडिंग मशीन खरेदी करून अवनि संस्थेस दिले. संस्थेने या मशिनच्या माध्यमातून शिरोली नाका येथे प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. मशिनमध्ये प्लास्टिकचे मिलीमिटरमध्ये तुकडे केले जात आहेत. आठ मि.मी.चे तयार झालेले तुकडे डांबरी खडी करण्यासाठी वापरले जात आहेत. पहिल्याच दिवशी प्रक्रिया केलेली खडी संभाजीनगर येथील पॅचवर्कच्या कामासाठी वापरण्यात आली. पहिल्या दिवशी ४० किलो प्लास्टिकचा वापर खडी करण्यासाठी केला गेला.