क्रिकेट जगत वसिम जाफरच्या भक्कमपणे पाठीशी

Wasim Jaffer

भारतीय क्रिकेटमध्ये कधी नव्हे असा जातीयवादी आरोपांचा दुर्दैवी  वाद वसिम जाफरच्या (Wasim Jaffer) उत्तराखंड (Uttarakhand) क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या (Coach) राजीनाम्यानंतर समोर आला आहे. मात्र भारतासाठी खेळलेल्या आणि रणजी स्पर्धेतील सर्वांत यशस्वी फलंदाज राहिलेल्या वसिम जाफरच्या पाठीशी क्रिकेट समुदाय भक्कमपणे उभा राहिला आहे. अनिल कुंबळेंसारख्या (Anil Kumble) दिग्गजांपासून ते दोद्दा गणेश, मनोज तिवारी (Manoj Tiwari) , इरफान पठाण अशा खेळाडूंनी जाफरला पाठिंबा व्यक्त केला आहे.

भारतीय संघात जाफरचे सहकारी राहिलेल्या अनिल कुंबळेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय, ‘मी तुझ्यासोबत आहे वसिम. तू जे केले ते योग्यच केलेस. दुर्दैवाने खेळाडूंना तुझ्या अनुभवाचा फायदा मिळणार नाही.

इरफान पठाणने म्हटलेय की, तुला स्पष्टीकरण द्यावे लागतेय ही दुर्दैवाची बाब आहे.

दोद्दा गणेशने म्हटलेय, प्रिय वसिम जाफर, क्रिकेटचे तुम्ही चांगले दूत आहात आणि मोठ्या अभिमानाने तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत असे व्हावे यावर विश्वास बसत नाही. तुम्ही क्रिकेटमधील हिरा आहात आणि एक व्यक्ती म्हणून भावासारखे आहात. क्रिकेट जगताला वसिम जाफर ही व्यक्ती कशी आहे ते माहीत आहे.

विदर्भ संघातील जाफरच्या सहकाऱ्यांनीसुद्धा  या आरोपांबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. वसिम जाफर मूळचा मुंबईचा असला तरी २०१५ ते २०२० दरम्यान तो विदर्भासाठी खेळला आणि रणजी स्पर्धेत विदर्भाच्या यशात त्याचा मोलाचा वाटा राहिला.

विदर्भाच्या दोन वेळच्या रणजी विजेत्या संघाचा कर्णधार राहिलेला फैज फझल म्हणाला की, हे फारच धक्कादायक आहे. मी वसिमसोबत चार सीझन खेळलोय. विदर्भ संघातील प्रत्येक खेळाडूसोबत त्याची वागणूक मोठ्या भावासारखीच राहिली आहे. तो अतिशय चांगला माणूस आहे, त्याच्या वागण्या- बोलण्यात मला काहीच चुकीचे वाटले नाही.

विदर्भ संघाचा यष्टिरक्षक अक्षय वाडकर म्हणाला की, वसिमने नेहमीच योग्य खेळाडू व त्यांच्या कामगिरीला प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना धर्माच्या आधारे प्राधान्य त्याने दिले असेल असे मला वाटत नाही. जेव्हा तो आमच्यासोबत खेळायचा तेव्हा त्याच्यासाठी प्रत्येक खेळाडू समान होता. त्यामुळे त्याच्यावरचे हे जातीय पक्षपाताचे आरोप अतिशय धक्कादायक आहेत.

अलीकडे आपले मते स्पष्टपणे मांडणारा म्हणून समोर आलेला क्रिकेटपटू मनोज तिवारी याने तर या प्रकरणात उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी लवकरात लवकर हस्तक्षेप करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. समाजासमोर उदाहरण ठेवायची वेळ आली असल्याचेही त्याने म्हटले आहे.

वसिम जाफरने मंगळवारी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्याने उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आपल्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आणि अयोग्य खेळाडूंच्या संघात निवडीचा आग्रह धरत असल्याचा आरोप केला होता तर याच्या उत्तरात उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव महिम वर्मा यांनी जाफरने जातीय पक्षपात करत संघात मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आणि संघात जातीयवादी वातावरण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जाफरने संध्याकाळी ऑनलाईन पत्रपरिषद घेऊन हे सर्व आरोप अतिशय  दुर्दैवी व व्यथित करणारे असल्याचे म्हणत या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER