चर्चा जोरात, रिषभ पंतला चौकार मिळायला हवा होता की नको?

Rishabh Pant

इंग्लंडविरुध्दच्या दुसऱ्या वन डे सामन्यात रिषभ पंतने (Rishabh Pant) 40 चेंडूतच 77 धावांची वादळी खेळी केली पण त्याची ही खेळी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे आणि ती त्याच्यामुळे नाही तर पंचांच्या निर्णयामुळे आणि क्रिकेटच्या विचित्र नियमांमुळे चर्चेत आली आहे.

झाले असे की भारतीय डावादरम्यान 40 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर टॉम करनचा (Tom Curran) चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याच्या नादात रिषभ गडबडला आणि त्याच्या बॕटीची आतील कड घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने सीमापार झाला. इकडे टॉम करनसह इंग्लंडच्या संघाने रिषभ पायचीत (LBW) असल्याचे अपील केले. पंचांनीही त्याला बाद दिले पण रिषभला विश्वास होता की चेंडू बॕटीला लागलेला आहे म्हणून त्याने रिव्ह्यू (DRS) घेतला आणि रिव्ह्यूमध्ये तो नाबाद ठरला पण ह्याच्यात झाले असे की, पंचांनी त्याला बाद दिल्याने तो चेंडू ‘डेड’ (Dead Ball) ठरला होता आणि त्यामुळे तो बॕटीला लागून सीमापार झाला असला तरी ‘डेड बॉल’ मुळे त्याला चौकार मिळाला नाही.

यावरुनच गोंधळ सुरू झालाय. चौकार होता की नाही? रिषभ आणि भारतीय संघाला चार धावांपासून वंचित ठेवण्यात आले का? नियमानुसार चौकार न देणे योग्य असले तरी हा नियम बदलण्याची गरज आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आणि ह्या अशा नियमापायी एखादा संघ दोन- तीन धावांसारख्या अगदी कमी अंतराने पराभूत झाला तर कुणाला दोष द्यायचा…नशिबाला, खेळाला की या नियमाला? अशी जोरदार चर्चा आता रंगली आहे.

त्यावेळी रिषभ 21 चेंडूत 27 धावांवर खेळत होता आणि त्यावेळी त्याने रिव्ह्यु घेतला नसता तर भारताचे फार मोठे नुकसान झाले असते हे नंतरच्या षटकांमध्ये भारताने ज्या गतीने धावा खेचल्या त्यावरुन स्पष्ट झाले आहे.

पंचांनी बाद दिले होते म्हणून तो चेंडू डेड झाला होता त्यामुळे त्यावर धावा मिळण्याचा प्रश्नच नाही असे नियम सांगतो पण पंचांचा तो निर्णय रिव्ह्युमध्ये बदलला. त्यामुळे धावांचा निर्णयही बदलायला हवा आणि फलंदाजाला धावा मिळायलाच हव्यात किंवा चेंडू डेड असेल तर तो खेळातूनच बाद व्हायला हवा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

हा गोंधळाचा नियम बदलण्यासाठी गेल्या विश्वचषक स्पर्धेवेळी लोयेस्ट बाऊंड्री काउंट नियमाने जो गदारोळ झाला होता तसा गदारोळ होण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद वाट पाहात आहे का, असा सवालही करण्यात येत आहे. फलंदाजाने बॕटीने चेंडू खेळून काढला म्हणून त्याला चौकार नाकारण्यात आला अशी ही विचित्र स्थिती असल्याची क्रिकेट जगतात चर्चा आहे.

विश्वचषक अंतिम सामन्यात समजा एखाद्या संघाला शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या आहेत आणि चेंडू फलंदाजाच्या बॕट-पॕडला लागून सीमापार झाला, पंचांनी फलंदाजाला बाद दिले पण रिव्ह्युमध्ये फलंदाज नाबाद ठरला तर…या नियमापायी तर त्या संघाचे विश्वविजेतेपदच हिरावले जाईल. असा नियम काय कामाचा? त्याचा पूनर्विचार होण्याची गरज असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

जर पंचाचा बाद देण्याचा निर्णय बदलत असेल तर त्या चेंडूवर ज्या काही धावा निघाल्या असतील त्या मिळायलाच हव्यात आणि तो डेड बाॕल असेल तर गोलंदाजाने त्याच्याऐवजी आणखी एक चेंडू टाकायला हवा अशी मागणी जोरात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER