पूजा अरुण राठोड म्हणजेच पूजा लहू चव्हाण होती का?

मुंबई : यवतमाळच्या (Yavatmal) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पूजा अरुण राठोड (Pooja Arun Rathod) नावाची एक तरुणी भरती झाली होती. तिचा गर्भपातही झाला आणि ही पूजा अरुण राठोड म्हणजेच पुण्यात दुसऱ्या दिवशी आत्महत्या केलेली पूजा लहू चव्हाण (Pooja Lahu Chavan) होती का, असा प्रश्न आता समोर आला असून पूजा चव्हाण आत्महत्येचे गूढ आणखीच वाढले आहे.

पूजा चव्हाणने ज्या दिवशी पुण्यात आत्महत्या केली तेव्हा तिच्यासोबत जे दोन तरुण होते त्यापैकी एकाचे नाव अरुण राठोड आहे आणि मृत्यूच्या दोन दिवस आधी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ज्या तरुणीचा गर्भपात करण्यात आला तिचे नाव पूजा अरुण राठोड असे आहे. या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का, त्यातील सत्य नेमके काय हे तपासण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. यवतमाळमध्ये गर्भपात करणाऱ्या मुलीचे खरे नाव पूजा अरुण राठोड हेच होते की दुसरे काही? हा प्रश्नही निर्माण झाला आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पूजा अरुण राठोडला भरती करून घेताना तिचे ओळखपत्र (आधार कार्ड आदी) तपासण्यात आले होते का, त्याची झेरॉक्स कॉपी रेकॉर्डला ठेवण्यात आली होती का, की कोणतेही ओळखपत्र न घेताच तिचा गर्भपात करण्यात आला, असे प्रश्नही निर्माण झाले आहेत. पूजाला विवाहित दाखविण्यात आले आणि मग गर्भपात केला गेला का, अशीही शंका घेतली जात आहे. कारण कुमारिका दाखविले असेल तर तिचा गर्भपात कायद्यात बसणारा ठरत नाही हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. पूजा चव्हाण म्हणजेच पूजा राठोड होती का, याविषयी इस्पितळातील अधिकारी बोलायला तयार नाहीत. एक डॉक्टर बेपत्ता झाले आहेत. जे आहेत ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

पूजा चव्हाणचा लॅपटॉप आणि तिचा मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. ते अजूनही पोलिसांना मिळालेले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. पूजाचे वडील लहू चव्हाण हे टीव्हीवर मुलाखती देत असून अश्रू ढाळत आहेत. आपल्या मुलीच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आहे याबाबत मात्र ते काहीही सांगायला तयार नाहीत. आमची उगाच बदनामी करू नका एवढेच ते सांगत आहेत. स्वत:च्या मुलीच्या आत्महत्येनंतरही एका पित्याने कोणाबद्दलही तक्रार करू नये हे एकूणच आश्चर्याचे वाटते. लहू चव्हाण यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी आता होत आहे.

पूजा ही संजय राठोड हे राज्यमंत्री असतानापासून मुंबईतील त्यांच्या शासकीय बंगल्यावर बरेचदा दिसायची. ती लोकांच्या त्या ठिकाणी गाठीभेटी घेऊन समस्या सोडवायची. संजय राठोड यांचे बरेच फोटो तिच्या फेसबूक अकाउंटवर आहेत. पूजा ही बंजारा समाजातील अतिशय गुणी मुलगी होती आणि फेसबूकवर तिला लाखो फॉलोअर्स होते.

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिने पुण्यात ७ फेब्रुवारी रोजी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ती दोन महिन्यांची गरोदर होती आणि तिचा गर्भपात आत्महत्येच्या काही दिवस आधी करण्यात आला होता असा दावा केला जात आहे. काही वृत्तवाहिन्यांनी तसे वृत्तही दिले आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चच्हाण आत्महत्येशी आधीच जोडले जात असून त्या अनुषंगाने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. पोलीस हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत असून त्या आधी राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर भाजप राठोडांच्या राजीनाम्यासाठी रणकंदन करणार हे स्पष्ट आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे समस्त बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी उद्या गुरुवारी मोठा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. संजय राठोड या उत्सवाला उपस्थित राहून मौन तोडतील असे म्हटले जात होते. मात्र, आता ते त्या ठिकाणी जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पूजा चव्हाण प्रकरणी आरोप सुरू झाल्यापासून संजय राठोड गायब आहेत. ते राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीलाही हजर नव्हते. गेल्या दहा दिवसांत कोणत्याही कौटुंबिक, शासकीय कार्यक्रमाला ते हजर राहिलेले नाहीत. कोणी म्हणते की ते मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानीच आहेत, कोणी दावा करतात की ते नागपुरातील त्यांच्या फ्लॅटवर आहेत. गेले दहा दिवस वन खात्याला मंत्री असून नसल्यासारखे आहेत अशी अवस्था आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER