झमानला धावबाद करताना डी कॉकची कृती योग्य होती का?

De Cock - Fakhar Zaman - maharastra Today

दक्षिण आफ्रिका (South Africa) व पाकिस्तानदरम्यानच्या (Pakistan) दुसऱ्या वन डे सामन्यात रविवारी जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे पाकिस्तानचा सलामी फलंदाज फखर झमान (Fakhar Zaman) याला 193 धावांची विक्रमी केल्यावर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) ज्या पध्दतीने धावबाद केले त्यावरुन वादंग उठले आहे. क्विंटन डी काॕकची कृती नियमांत बसणारी होती का? आणि नियमांत बसणारी जरी असेल तरी ती खेळाडूवृत्तीला धरुन होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र स्वतः फखर झमानने या प्रकरणात आपली स्वतःची चूक असून क्विंटन डीकाॕकला दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

झाले असे होते की सामन्याच्या शेवटच्या षटकात फखर झमान दोन धावा घेताना धावबाद झाला. पण हे धावबाद होणे काहीसे विचित्र होते. लाँग आॕफवरुन आलेल्या मरक्रामच्या डायरेक्ट हिटवर आलेला थ्रो झमानला सुरुवातीला वाटला की गोलंदाजाच्या टोकाला येतोय. पण थ्रो आला यष्टीरक्षकाकडे आणि त्याच टोकाकडे धावणाऱ्या झमानला डीकॉकने चकवा दिला. त्याने गोलंदाजाकडे बोट दाखवून दर्शवले की चेंडू त्या एण्डला जातोय.वास्तविक चेंडू डीकाॕकच्या हातातच होता पण या चकव्याने झमान चुकला. संथ झाला आणि त्याने मागे वळून पाहिले. दरम्यान इकडे डी काॕकने यष्ट्या उडवून त्याला धावबाद केले आणि यानंतर डीकाॕकच्या चेहऱ्यावर जे मिश्किल हसू आले ते बघण्यासारखे होते. याप्रकारे 155 चेंडूतील झमानची विक्रमी 193 धावांची खेळी संपुष्टात आली. तो ज्याप्रकारे खेळत होता ते पाहता कुणी गोलंदाज त्याला बाद करेल हे शक्यच नव्हते, म्हणून धावबादने त्याची खेळी संपुष्टात आली. पण ती वादग्रस्त ठरली.

डी काॕकने त्याला याप्रकारे चकवा देऊन बाद केले हे नियमात बसते का, हा चर्चेचा विषय बनला. मात्र या वादावर पडदा टाकताना झमानने म्हटलेय की ती माझी चूक होती. माझे लक्ष क्षेत्ररक्षकाकडे असायला हवे होते.

डीकाॕकची ही कृती जाणिवपूर्वक मानली तर तो नियमभंग ठरतो आणि त्यासाठी नियम 41.5.1 अन्वये पाच धावांचा दंड होतो, फलंदाज नाबाद ठरतो शिवाय तो चेंडू पुन्हा टाकावा लागतो. या नियमानुसार कोणत्याही क्षेत्ररक्षकाने आपले बोलणे अथवा कृतीतून स्ट्रायकरकडे चेंडू आल्यानंतर जाणिवपूर्वक फलंदाजाचे लक्ष विचलीत करणे, त्याची दिशाभूल करणे किंवा अडथळा आणणे ही दंडनीय कृती आहे.

झमानने मात्र दोष आपल्यावर घेत म्हटलेय की, चूक माझी होती कारण माझे लक्ष दुसऱ्या टोकाकडील हॕरिस रौफकडेच होते. तो थोडा उशिराने धावला म्हणून तो संकटात आहे,असे मला वाटत होते. आता मॕच रेफरी जे काय ठरवतील ते ठरवतील पण क्विंटनचा काही दोष आहे असे मला वाटत नाही. या सर्व प्रकारात मैदानातील पंचांचेही दुर्लक्ष झाले पण आता झमानच्या विधानानंतर त्यांची चौकशी टळेल अशी चिन्हे आहेत.

झमान बाद झाल्यानंतर क्विंटनने ज्याप्रकारे आनंद साजरा केला त्यावरुन त्याच्या निर्दोषत्वाबद्दल शंका आहे पण ते दोषी आहे हे सिध्द करणेसुध्दा तेवढे सोपे नाही. कदाचित आपण एडन मरक्रामला चेंडू गोलंदाजाच्या टोकाला फेक असे सांगत होतो, फलंदाजाकडे आपला इशारा नव्हता असा दावा तो करू शकतो. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमा याने म्हटलेय की क्विंटनने चतुराई दाखवली एवढेच मी म्हणेन.

स्वतः बावुमासुध्दा नियमभंगाच्या कचाट्यातून बचावला. 47 व्या षटकात बावुमाला झमानचा झेल टिपता आला नाही पण तो बावूमाकडून सुटलेला चेंडू त्याच्या डोक्याला लागून झमानच्या बॕटीवर आदळला. त्यावरही पाच दंड धावा पाकिस्तानला मिळायला हव्या होत्या पण पंचांनी त्या दिल्या नाहीत.

ही बातमी पण वाचा : आयपीएलचे मुंबईतील सामने ठरल्याप्रमाणेच होणार : सौरव गांगुली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button