नव्या कोरोना विषाणुशी चर्चा करून रात्रीची संचारबंदी लावली का ? ; जलील यांचा खोचक सवाल

Imtiaz Jalil

औरंगाबाद :- नवीन कोरोना (Corona) विषाणु काही देशांत आलेला असल्याच्या बातम्यांनी जगभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने पाऊल उचलत ब्रिटनमधून येणा-या फ्लाईट्सना निर्बंध घातले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी तोफ डागली आहे. कोरोना रोखण्यासाठी घेतलेला रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू आढळला असल्याचे सांगितले जात आहे. नव्या कोरोना विषाणुची तीव्रता लवकच समजेल असे तज्ञांनी सांगितले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. भारतात या नव्या विषाणूचा धोका निर्माण होऊ नये म्हणून भारत – ब्रिटनमधील विमानसेवा तूर्त बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयापाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही काही महत्त्वाची पावले टाकली आहेत. मुंबई-लंडन अशी विमानसेवा नियमितपणे सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपर्यंत येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून राज्यातील महापालिका हद्दीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहिर केला आहे. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

ही बातमी पण वाचा : सावधान ! नवीन कोरोना विषाणूचं संक्रमण ब्रिटनपुरतं मर्यादित नाही

‘कोरोना विषाणूने राज्य शासनासोबत काही चर्चा केली आहे का? मी दिवसा झोपेन आणि रात्री बाहेर पडेन असे या विषाणूने सांगितले आहे का?’, असे उपरोधिक सवाल करत जलील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय असल्याचेही त्यांनी नमूद केले. याबाबत इम्तियाज जलील यांनी ट्वीट केले आहे. यापूर्वी रात्रीच्या संचारबंदीबाबत खासदार जलील यांनी अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पुन्हा तीच प्रतिक्रिया त्यांनी राज्य शासनाच्या ताज्या निर्णयानंतर दिली आहे.

जलील यांनी ख्रिसमसचा मुद्दाही ट्वीटमध्ये मांडला आहे. ख्रिस्ती बांधव रात्री १२ वाजल्यापासून ख्रिसमस सोहळ्याची सुरुवात करतात. त्यांच्यासाठी हा एकमेव असा सर्वात मोठा सण असून राज्यात रात्रीच्या संचारबंदीमुळे या सणात अडसर ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा व मध्यरात्रीनंतरही चर्च खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती जलील यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER