जावेद अख्तर यांच्या बदनामी खटल्यात कंगनाविरुद्ध वॉरन्ट

Kangana Ranaut - Javed Akhtar
  • २२ मार्च रोजी कोर्टात हजेरीचा हुकूम

मुंबई : सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेल्या बदनामी खटल्यात अंधेरी येथील महानगर दंडादिकारी न्यायालयाने सोमवारी बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट जारी केले. येत्या २२ मार्च रोजी कोर्टात हजर होण्यासाठी हे वॉरन्ट आहे.

महानगर दंडाधिकारी आर. आर. खान यांनी याआधी कंगनाविरुद्ध आज सोमवारी १ मार्च रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स काढले होते. परंतु ती हजर झाली नाही किंवा तिने गैरहजेरीची परवानगी घेण्यासाठी अर्जही केला नाही.

कंगनाने सोमवारी केलेल्या एका टष्ट्वीटचा हवाला देत अख्तर यांच्या वकील अ‍ॅड. वृंदा ग्रोव्हर यांनी असे सांगितले की, कोर्टाने आज हजर राहण्याचे समन्स काढले असल्याची कंगना हिला माहिती असल्चे या ट्वीटवरून दिसते. तरी ती हजर झालेली नाही. ‘गीधडोंचा एक झुंड और एक शेरनी…मजा आयेगा..’ असे ते टष्ट्वीट होते.

यावर कंगनाचे वकील अ‍ॅड. रिझ्वान सिद्दिकी म्हणाले की, खटल्यात ‘प्रोसेस इश्यू’ करण्याच्या आधीच्या निकालाविरुद्ध कंगना अपील करणार आहे. परंतु, तुम्हाला अपील करायचे तर जरून करा, पण त्यात निकाल होईपर्यंत तुम्ही (कंगना) या कोर्टाचा आदेश पाळायचे टाळू शकत नाही, असे सांगून दंडाधिकारी खान यांनी वॉरन्ट काढण्याचा आदेश दिला.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या संशयास्पद मृत्यूनंतर ‘रिपब्लिक टीव्ही’वर अर्णव गोस्वामी यांच्यासोबत १९ जुलै रोजी झालेल्या एका चर्चात्मक कार्यक्रमात कंगना हिने केलेल्या कथित बदनामीकारक विधानांबद्दल जावेद अख्तर यांनी ही खासगी फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. स्वत: जावेद अख्तरही वकिलांसोबत न्यायालयात हजर होते.

ही फिर्याद दाखल झाल्यावर न्यायालयाने अख्तर यांचा जबाब नोंदवून जुहू पोलिसांना तपास करण्यास सांगितले होते. त्यांनी अख्तर यांच्या प्रतिपादनात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचा अहवाल दिल्यानंतर खटला चालविण्याची सुरुवात करण्यात आली आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER