विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; तापमान ४० अंशांवर

Summer High Temperature

नागपूर : नुकताच मार्च महिना सुरू झाला आहे आणि इकडे नागपूरसह संपूर्ण विदर्भात सूर्याची दाहकता अचानक वाढली आहे. त्यामुळे विदर्भात उन्हाळ्याची सुरुवात झाल्याची अनौपचारिक घोषणा झाली आहे. तर महाराष्ट्रातही उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात यंदा सरासरीपेक्षा तापमान जास्त राहण्याची शक्यता नागपूर हवामान खात्यानं वर्तवली आहे. नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यात मंगळवारी अकोला जिल्ह्यात सर्वांत  जास्त तापमानाची नोंद झाली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवते आहे. त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच यंदा विदर्भातील तापमानात वाढ झाली. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर यासह अनेक जिल्ह्यांत सरासरी तापमानापेक्षा जास्त तापमान आहे. उद्यापासून चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भात तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी दिली.

नागपूर हवामान विभागानं उद्यापासून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअस जास्त तापमान राहणार आहे, असा  अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात उष्ण वारे वाहात आहे. त्यामुळे आर्द्रतेत वाढ होत आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात नागपूर, अकोला, वर्धा, गोंदिया आणि यवतमाळ यासारख्या अनेक शहरांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर अकोल्यात आज ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ चंद्रपुरात ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

उष्णता वाढीची कारणं काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील  दिवसा तापमान हे सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत ४-६  डिग्री सेल्सिअसने अधिक असेल. तर काही ठिकाणी हे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकतो. अरबी समुद्रात वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रतेत वाढ झाली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मार्चचा दुसरा आठवडा हा पहिल्या आठवड्यापेक्षा अधिक उष्ण राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER