
बॉलिवूडमध्ये वॉर फिल्म बनवण्याचे प्रमाण तसे पाहिले तर फार कमी आहे परंतु गेल्या काही वर्षात वॉर फिल्मची निर्मिती करण्याकडे निर्मात्यांचा कल वाढलेला दिसत आहे. केवळ भारत-पाकिस्तान किंवा भारत-चीन युद्धाचाच विषय या सिनेमांसाठी घेतला जात असून या युद्धांमध्ये कामगिरी केलेल्या विविध व्यक्ती आणि टँक, लढाऊ विमानांवरही सिनेमे तयार केले जात आहेत. 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात एका वीर सैनिकाने त्याच्या भाऊ आणि बहिणीसोबत पाकिस्तानला रोखून बांग्लादेशची निर्मिती करण्यात मदत केली होती. यावेळी रणगाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता आणि त्याच एका रणगाड्यावर आधारित ‘पिप्पा’ (Pippa) नावाचा सिनेमा तयार केला जात आहे. या सिनेमाला संगीत देण्यासाठी जगविख्यात संगीतकार ऑस्कर विजेता ए. आर. रहमानला (A. R. Rahman) साईन करण्यात आले आहे.
ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांनी या संपूर्ण घटनेवर आधारित ‘द बर्निंग शॅफीज’ नावाची एक कादंबरी लिहिली आहे. त्या कादंबरीवर आधारित या सिनेमात ईशान खट्टर ब्रिगेडियर मेहता यांची भूमिका साकारीत आहे. ब्रिगेडियर मेहता 45 व्या कॅव्हेलरी टँक स्क्वाड्रनचा भाग होते. सिनेमाचे शीर्षक रशियन वॉर टँक PT-76 वर ठेवण्यात आले आहे ज्याला प्रेमाने पिप्पा म्हटले जात असे. हा रणगाडा पाण्यावर सहज तरंगू शकतो म्हणून त्याला पिप्पा म्हटले जाते. पिप्पाचा अर्थ आहे तूपाचा एक रिकामा डबा जो पाण्यात आरामात तरंगू शकतो. या सिनेमाचे दिग्दर्शन राजा कृष्ण मेनन असून रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉयकपूर करीत आहे. ए. आर. रहमानने या दोघांसाठी अनेक सिनेमांचे संगीत तयार केलेले आहे.
ए. आर. रहमानला या सिनेमाबाबत विचारले असता त्याने सांगितले, हा सिनेमा मानवीय भाव-भावनांवर आधारित आहे. जेव्हा सिनेमाची कथा मला सांगितले तेव्हा मला जाणवले की, ही प्रत्येक कुटुंबाची गोष्ट आणि. त्यामुळे मी लगेचच या सिनेमाला संगीत देण्यास तयार झालो. यावर्षी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला