विदर्भाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा होती पण…!- वसिम जाफरचा धक्कादायक गोैप्यस्फोट

wasim jaffer

भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज आणि मुंबई व विदर्भाचा रणजी खेळाडू वसिम जाफर याने आपल्याला विदर्भाच्या संघाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा होती पण विदर्भ क्रिकेट संघटनेकडून त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही असे धक्कादायक विधान एका आघाडीच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. यानंतर त्याने उत्तराखंडच्या प्रशिक्षकाची जबाबदारी गेल्याच महिन्यात स्विकारली आहे.

मुळचा मुंबईचा खेळाडू असलेला जाफर २०१५ पासून विदर्भासाठीे खेळला आणि त्याच्या काळात विदर्भाच्या संघाने लागोपाठ दोन वेळा रणजी विजेतेपद पटकावले. त्यात वसिमचे फलंदाज म्हणून योगदान उल्लेखनीय होते मात्र आता निवृत्तीनंतर प्रशिक्षकपदासाठी इच्छूक असताना विदर्भाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने तो व्यथित झाला आहे.

विदर्भालाच आपले पहिले प्राधान्य होते, मात्र विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने आपल्याला इतर पर्याय स्विकारावा लागला असे त्याने म्हटले आहे.

यासंदर्भात जाफरने म्हटले आहे की, मी प्रशांत यांना आपण विदर्भाच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छूक असल्याची कल्पना दिली होती. त्यांनी मला फलंदाजी सल्लागाराचा प्रस्ताव दिला होता परंतु आपण विदर्भ संघासाठी बराच काळ खेळलेलो असल्याने मुख्य प्रशिक्षकपदासाठी इच्छूक होतो. माझ्यासाठी हा बदल सहज राहिला असता कारण विदर्भ संघातील खेळाडू व त्यांची कार्यपद्धती मी चांगल्याप्रकारे जाणून आहे. गेल्या तीन वर्षांपासून आपण चंद्रकांत पंडीत यांच्यासह विदर्भाच्या खेळाडूंसोबत आहोत. त्यामुळे आपली एक जवळीक विदर्भाशी झाली आहे. विदर्भ हे माझे दुसरे घरच असल्याचे मी बºयाचदा म्हटले आहे. असे असूनही त्यांच्याकडून प्रतिसादच मिळत नसेल तर मला इतर पर्याय स्विकारण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता, अशा शब्दात जाफर यांनी आपले मन मोकळे केले आहे.

प्रशांत वैद्य यांनी आपल्याला १७ मे नंतर लॉकडाऊन उठेल अशा शक्यतेसह १७ मे नंतर सांगतो असे आश्वासन दिले होते परंतु काहीच प्रतिसाद आला नाही. नंतर प्रशांत वैद्य यांच्याशी संपर्काचे प्रयत्नही निष्फळ ठरल्याचे त्याने म्हटले आहे.

विदर्भाने प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली नसल्याने आपण नाराज नाही पण त्यांनी नकार तरी कळवायला हवा होता एवढीच अपेक्षा होती. प्रत्येकाचे विचार आणि दृष्टी वेगळी असते हे मी समजू शकतो पण फोन वा मेसेजेसना प्रतिसादच न देणे हे जास्त दु:खदायक होते. निर्णय घेण्यासाठी वेळ लागणार होता तर ते मला तसे सांगू शकले असते, मी वाट पाहिली असती पण काही प्रतिसादच नाही म्हटल्यावर काय समजायचे. ते मला टाळत आहेत असाच यातून अर्थ निघत होता असे जाफरने म्हटले आहे.

जाफरने रणजी स्पर्धेत सर्वाधिक ११ हजाराच्यावर धावा केल्या आहेत. त्यापैकी विदर्भासाठी ३७ सामन्यांत २५६५ धावा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER