लाल किल्ला परिसरात तलवार भिरकावणाऱ्या मोनिंदर सिंग मोनीला अखेर अटक

Arrested - Moninder Singh

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ला परिसरात हिंसक वातावरण निर्माण झाले होते. या हिंसेतील मोस्ट वाँटेड असलेला आरोपी मनिंदरसिंग मोनीला अखेर 21 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. 30 वर्षीय मोनी हा व्यवसायाने मॅकेनिक आहे. पोलीस निरीक्षक पवनकुमार आणि करमबीर यांच्या पथकाने मोनीला काल 16 फेब्रुवारी रोजी सीडी ब्लॉक पीतमपुरा येथील बस स्थानकावरुन ताब्यात घेतलं. त्याच्या घरातून लाल किल्ला परिसरात हवेत भिरकावलेली तलवारही जप्त केली गेली आहे.

स्वरुप नगर येथील मोनीच्या घरातून 4.3 फूटाच्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. लाल किल्ला परिसरात हिंसा घडली तेव्हा या परिसरात मोनीने तलवार भिरकावून धुमाकूळ घातला होता. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला असून तो लाल किल्ला परिसरात तलवार नाचवत असल्याचं दिसत आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, मोनी हा तलवार नाचवून जमावाला पोलिसांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देत होता. त्याने भडकावणाऱ्या अनेक पोस्टही केल्या होत्या. शेतकरी आंदोलना दरम्यान तो सिंधु बॉर्डरवर जात होता. तिथे दिल्या जाणाऱ्या भाषणांमुळे तो अधिक प्रभावित झाला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

तो राहत असलेल्या स्वरुप नगर परिसरातील 6 लोकांना ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्यासाठी त्याने प्रोत्साहन दिल होतं. तशी कबुलीही त्याने दिली आहे. हे सहा लोक बाईकवरून सिंधु बॉर्डर ते मकबरा चौकापर्यंत जाणार्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनीने पाच सहकाऱ्यांसह इतर दोन लोकांसोबत मिळून लाल किल्ल्यात घुसखोरी केली होती. तिथे त्यांनी तलवारबाजी केली होती. त्यामुळे काही लोकांना स्फूरच चढलं आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनी हा स्वरुप नगरमध्ये एक क्लास सुरू केला आहे. त्यात तलवारबाजी कशी करायचे याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्या फोनमधून लाल किल्ल्यातील घटनेचा व्हिडीओही सापडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER