
सांगली : मागील २० वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय भूमिका निभावत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न पूर्ण करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. मात्र हे स्वप्न पूर्ण करणे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हातात आहे, असा मोठा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनलशी बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड करत गौप्यस्फोट केला.
मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षबांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांपैकी कोणाला प्रधान्य द्याल, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय शरद पवारच घेऊ शकतात.
त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असतोच. त्यामुळे या प्रश्नावर बोलणे योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी पाटील यांनी तरुणांना राजकीय यशाचा कानमंत्रही दिला. तरुणांना जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी फक्त पोस्टरबाजी करून चालणार नाही. त्यांना जनतेत उतरून काम करावं लागेल, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या सर्वच पक्षांमध्ये उत्साही आणि वैचारिक बांधिलकी असलेल्या तरुणांची कमतरता आहे, असं सांगतानाच शिकलेल्या तरुणांनी राजकारणाला प्राधान्य दिलं पाहिजे.
तरुणांनी चौकात बॅनर लावण्यापेक्षा जनतेत उतरून काम केलं पाहिजे. आपापसातील संघर्ष टाळून प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं सांगतानाच नाही तर काही दिवसांनी उमेदवार हवा म्हणून राजकीय पक्षांना जाहिरात द्यावी लागेल, असं ते म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला