
कराड :- एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे तर दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजकारणात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसइतका प्रभाव पाडू न शकलेल्या काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून ती सध्या विधानसभेचे अध्यक्ष असलेले काँग्रेसचे आक्रमक नेते नाना पटोले यांच्याकडे सोपवली जाणार असून, त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र याबाबत आमदार चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत नाराजी कायम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी माझे नाव दिले आहे. पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना दिला आहे, असे समजते. मात्र त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कुठलीही विचारणा झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी त्यावर काही मत व्यक्त करणार नाही. राहिला प्रश्न विधानसभा अध्यक्षपदाचा. त्या पदावर जायचे असते तर सहा महिन्यांपूर्वीच ते पद घेता आले असते, असे म्हणत चव्हाण यांनी नाराजी पुन्हा एकदा उघड केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला