“वानोळा असाही..!”

Mother's Day

हाय फ्रेंड्स ! आज मदर्स डे. त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ! सगळ्यांना माहीतच आहे की कुणाचीही आई गावाकडून, घरून मुलीकडे किंवा मुलाकडे खूप सारे पदार्थ पाठवत असते. काय नसतं त्यात . घरच्या डाळी ,ज्वारी, कुरडया, खारोड्या ,तिखट ,हळद ,चिंच ,सुकेळी ,आंब्याच्या पोळ्या, शिकेकाई , कुरडयाचा वाळवीलेला चीक , मसाला ,गुळआंबा, साखरआंबा या सगळ्याला “वानोळा” असा शब्द आहे. खरं म्हणजे फक्त आईच पाठवते असं नाही, पण कुणीही कूणालाही म्हणजे शेजार्‍यांना सुद्धा जर काही असं पाठवलं प्रेमाने तर त्याला “वानोळा “असेच म्हणतात. माझ्या मनात आलं किती आनंद होतो हे सगळं बघून . त्यातून फक्त प्रेम ओसंडून वाहत असतं. प्रत्येक पदार्थ करताना आणि भरून पाठवताना प्रत्येक वेळी आपल्या मुला मुलीची आठवण असते किंवा समोरच्याची आठवण असते मनामध्ये ! आजच्या काळात फक्त मुलीच दूर जात नाहीत तर मुलेही दूर जातात त्यांनाही “वानोळा” पाठवावा लागतो .

माझ्या मनात आलं की आज” मदर्स डेच्या निमित्ताने काही वानोळा मुलांसाठी, अर्थात सगळ्या वाचकांसाठी ,आणि नवीन पिढीच्या प्रतिनिधी साठी पाठवावा . तोही थोडासा वेगळा . अशा काही गोष्टी जिच्यामुळे त्यांचं जगणं सोपं, दर्जेदार आणि छान होईल. सध्या सगळी मुलं नोकरी, व्यवसाय निमित्य शहरातून राहतात .अत्यंत फास्ट लाईफ असत त्यांचं . स्वतःला मॅनेज करणे, घर आणि नोकरी यांचं संतुलन राखणं, परस्परांना सांभाळणं आणि छोटी मुलं असतील तर मग सगळी वेगळीच धावाधाव. अशा वेळी अगदी साध्या साध्या गोष्टींची आठवण राहत नाही. ती कोणीतरी करून द्यावी लागते. उदाहरणार्थ अगदी दररोज दिवसभर कामाच्या व्यापात मध्ये पाणी पिण्याची आठवण राहत नाही. वास्तविक बघता दिवसातून तीन ते चार लिटर पाणी कमीत कमी प्यायला जायला हवं. पण त्याचीही आठवण राहत नाही. आयुष्य आणि वर्क या दोन्हींचा समतोल साधताना काही गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या ठरतात.

१) होम मेड फुड : ती खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कारण माणूस शेवटी सगळा आटापिटा करतो तो खाण्यासाठी, पोट भरण्यासाठी. अशा वेळेला आपल्या दिवसाचे नियोजन करताना आपल्या जेवण बनवण्याचा थोडासा वेळ द्यायलाच हवा. आणि त्यासाठी ऍटलिस्ट आपली काम आपल्याला करता यायला हवी. त्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची वेळ यायला नको. नेहमी बाहेरून पार्सल मागवणे योग्य नाही. त्याऐवजी स्वयंपाकाची मावशी लावली , तर निदान स्वच्छ वातावरणामध्ये स्वयंपाक होतो आहे ही खात्री आपल्याला असते. आणि आपल्याला वेळ असेल त्याप्रमाणे आपण आपल्या आवडीचे पदार्थ बनवू शकतो. त्यासाठी मदतनीस म्हणून या मावशींची मदत घेऊ शकतो. उदाहरणार्थ भाज्या चिरणे, कुटणे, वाटणे, निवडणे, सोलणे वगैरे .अशी वेळ खाऊ कामे.

२) व्यायाम : सुरुवातीपासूनच व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असण्याची सवय लावून घ्यायची. आपण एकही दिवस जेवल्याशिवाय सोडत नाही. व्यायाम करायला सुट्टी कशी मिळवता येईल याच्या युक्त्या मात्र आपण शोधत राहतो. ही प्रत्येकाची प्रवृत्ती आहे. म्हणूनच मनाविरूद्ध मनाला लावायच्या शिस्ती मध्ये याचा समावेश करायलाच लागेल.

३) परस्परांसाठी वेळ द्या.: आजकाल वीकेंड सुट्टीच्या दिवशी किंवा सुटीच्या दिवशी हा प्रयत्न केला जातो. तो जाणीव पूर्वक करावा. आणि जो वेळ परस्परांसाठी देऊ त्यात विसंवादांना जागा देऊ नाही .

४) मुलांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ द्या. फक्त शांत, स्वस्थ आपण बसलेलो आहोत आणि मुलं खेळत आहेत .काहीतरी आपल्याला सांगत आहेत. आणि असा हा कॉमन वेळ खूप छान जातो आहे असा कॉलिटी टाइम जर असेल तर आपण मुलांपर्यंत पोचू शकतो. त्यांच्या सुख दुःखा मध्ये सामील होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपली एखादी हॉबी नक्की डेव्हलप करावी. लग्न झालं, नोकरी लागली, आणि सगळं काही सुटलं हे कृपया व्हायला नको. जेव्हा केव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येतात, कठीण दिवस येतात अशा काळात आपले छंद, उपयोगात येतात,साथ देतात.

५) प्रायोरिटी ठरवा : आयुष्यात कुठल्याही गोष्टीची काहीएक वेळ असते . त्या त्या वेळेला त्या झाल्या, तरच त्या योग्य असतात. लग्नाची वय खूप वाढली आहेत. (दुसरे टोक म्हणजे बालविवाह) पण योग्य वेळी लग्न, जर अपत्य हवी असतील तर योग्य वेळेला मुल होण्याबाबत निर्णय घेणे. आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नवीन घरात थोडाफार रुळेपर्यंत , सगळ्यांच्या स्वभावाची ओळख होईपर्यंत आंधळेपणाने हा निर्णय घेणेही योग्य नाही . प्रत्येकाच्या प्रायॉरिटी ह्या परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या असतात .त्या आपल्या आपण निश्चित कराव्या.

६) माणसे जपा आणि कुटुंब बांधून ठेवा : आजच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात मोठी गरज आहे. जितकी स्पेस स्वतःला, दोघांना हवी असते .तसाच थोडासा वेळ दोघांच्याही कुटुंबीयांना देणे गरजेचे असते .त्यांच्याही काही गरजा असतात. त्यांनाही आपली सून किंवा आपला जावई यांचं कौतुक असतं. त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यांच्याशी बोलणं, त्यांचा आवाज ऐकणं हे त्यांचे आनंदाचे क्षण असतात. नातवंडांबरोबर खेळ ही त्यांची गरज असते. ही त्या वयाची गरज असते. आपण त्या वयात गेल्यानंतर आपली हीच गरज असणार आहे याची जाणीव आत्तापासून ठेवायला हवी.

कदाचित चार जणांबरोबर राहताना काही बाबतीत मनाला मुरड घालावी लागेल. पण त्यामुळे तो समोरचा माणूस आनंदी होईल. लोकांना खूष करण्यासाठी आपल्याला काहीही करायचं नाही. म्हणजे त्यात आपल्या कम्फर्टचा बळी द्यायचा नाही हे जितकं खरं ,तितकंच आपली माणसं आनंदीत झालेली बघितल्यावर जे समाधान मिळतं त्याचं गणित नाही मांडता येत. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. परंतु बरेचदा स्वातंत्र्याची कल्पना यात आड येते. मागच्या लेखांमध्ये बघितल्याप्रमाणे , आपल्या “पेरेंट्स फाईल” मध्ये, सासरची माणसं म्हणजे “अशीच” जे अनुभव आपल्या आई, मावशी यांना आलेले असतात .त्यावरून आपल्या या मनातला टिपकागद ही नोंद करून ठेवतो. परंतु आपली “ॲडल्ट फाईल “उघडून सारासार विवेक बुद्धी वापरली तर आजच्या काळातील आपली सासरची मंडळी आपल्याला त्रास देणारी नाहीत .उलट मदतच होईल हे लॉजिक वापरायला लागेलं. बघा फ्रेंडस् ! ट्रांजेक्शनल एनालिसिस ही थेरपी किती ठिकाणी उपयोगी पडते.

( “हे सगळे माझ्याच बाबतीत का ?” आणि “विसंवादाच्या वाटेवरून माघारी येताना !” हे याच कॉलम मधील लेख संदर्भासाठी वाचता येतील.)

७) नाही म्हणायला शिका. : बरेच वेळा आपल्या ऑफिसमध्ये काम करताना जास्तीत जास्त जबाबदारी जो काम मन लावून करतो, प्रामाणिक असतो त्याच्यावर टाकली जाते. बरेचदा आपली कामं संपवून दुसऱ्याची पण कामे डोक्यावर येऊन बसतात. म्हणजे थोडक्यात बरेचदा गृहीत धरलं जातं . अशावेळी मात्र स्पष्टपणे नकार द्यायला शिकायला लागतं. सुट्टीच्या दिवशीचे फोन कॉल्स किती घ्यायचे आणि घ्यायचे की नाही, याची लिमिट आपण आपली घालावी. नाहीतर आपल्याला आयुष्य आणि ऑफिस वेगळं ठेवता येणार नाही. आणि आयुष्यातला आनंद आपण गमावून बसू.

८) तुमचे कपडे, कागदपत्र, वस्तू ॲक्सेसरीज यांचे नियोजन: हे वारंवार सॉर्टिंग करून नीटनेटके, जागच्याजागी ठेवल्यामुळे वेळेवर सापडतील आणि आपला गोंधळ उडणार नाही. आपल्या दररोजच्या आयुष्याला एक प्रकारची शिस्त येईल. आणि मोकळा वेळ मिळणे शक्य होईल. त्याच प्रमाणे तुमची सकाळ आणि संध्याकाळ हीदेखील प्लान असायला हवी.

९) विचारांना स्पष्टता देऊन नको असलेल्या विचारांना हद्दपार करा : त्यासाठी आपले विचार एका पेपर वर लिहून त्यांना स्पष्टता द्या.

१०) Cup of Tea with Friends : ही गोष्ट आपल्या आयुष्याला रंगीत बनवायला मदत करेल. नेहमीच्या या गडबडीच्या आयुष्यातून काही वेळ आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर घालवा.
आज हाच वानोळा माझ्याकडून तुमच्यासाठी पाठवते आहे.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button