
पुणे : मागील आठवड्यापासून असलेले ढगाळ वातावरण आता निवळत आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणाने थंडी गायब (Cold) झाली होती. येत्या चार दिवसांत हवामानातील कोरडेपणा वाढणार असून तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून थंडीचा लपंडाव डाव सुरू आहे. ग्रीष्म ऋतूला सुरुवात होण्यापूर्वी सलगपणे थंडीचा अनुभव मिळण्याची आशा आहे.
यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अगदी वेळेवर थंडीची चाहूल लागली. मात्र, दर १५ दिवसांनी वातावरणातील बदलामुळे थंडी गायब होऊन वातावरणात बदलाचा अनुभव येत राहिला. गेल्या दोन महिन्यांत आता चार वेळा थंडी गायब झाली आहे. यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने काढता पाय घेतल्यानंतर वातावरणात बदल जाणवू लागला होता. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तुलनेत सरासरी सहा ते आठ अंशांनी पारा घसरल्याने यंदा कडक हिवाळ्याचा अनुभव आला. मात्र, त्यानंतर आठच दिवसांत तापमानात एकदम बदल झाला. त्यावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन आंध्रप्रदेश, तेलंगणासह राज्यात बाष्पाचा पुरवठा झाला.
त्यामुळे काही भागांत पाऊस झाला. परिणामी महाराष्ट्रातील तापमानात लक्षणीयरीत्या वाढ झाली. पुन्हा हवेत गारठा वाढला. परत एकदा ‘निवार’ या चक्रीवादळामुळे मध्य भारतातील वातावरण बदलले. ते आठ दिवस ढगाळ वातावरण राहिले. यानंतर डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा ढगाळ वातावरण बनले. कमाल २८ तर किमान २२ अंश सेल्सिअस तापमान झाले. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण बनले. यामुळे राज्यात सरासरी कमाल ३५ अंश तापमानाची नोंद झाली. आता पुन्हा हवेत कोरडपणा निर्माण होऊन थंडीची चाहूल लागेल. तापमानात मोठी घट होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला