वायकरांचा किरीट सोमय्यांविरुद्ध १०० कोटींचा बदनामीचा दावा

Kirit Somaiya - Bombay High Court - Ravindra Waikar - Maharashtra Today

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) आामदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर (Manisha Waikar) यांनी भाजपाचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीबद्दल १०० कोटी रुपयांची भरपाई मागणारा दिवाणी दावा मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल केला आहे.

स्वत:च्या पक्षातही कोणी विचारत नसल्याने हताश झालेले सोमय्या आपले राजकीय बस्तान बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे बदनाम करण्यासाठी आपल्यावर वारेमाप खोटे व निराधार आरोप करत असतात, असे वायकर दांपत्याचे म्हणणे आहे. वायकर दाव्यात म्हणतात की, कोणीच लक्ष देत नसल्याने सोमय्या लक्ष वेधून घेण्यासाठी निष्कारण आम्हाला लक्ष्य करत आहेत.

वायकर दांपत्य दाव्यात म्हणते की, सोमय्या यांनी केलेले आरोप कितीही बाष्कळ असले तरी वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये त्याला ठळक प्रसिद्धी मिळते. आता याच सुनियोजित योजनेचा एक भाग म्हणून सोमय्या यांनी पोलिसांकडे एक फिर्याद दाखल केली आहे. त्या फिर्यादीच्या आधारे अधिकार्‍यांची दिशाभूल करून सोमय्या आम्हाला त्रास देतील म्हणून आम्हाला हा दावा दाखल करावा लागत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वायकर यांनी आपापल्या पदांचा दुरुपयोग करून रायगड जिल्ह्यात स्थावर मालमत्ता खरेदी केल्या व नंतर त्या अनुक्रमे रश्मी व मनीषा या आपापल्या पत्नीच्या नावे हस्तांतरित केल्या, असा आरोप सोमय्या यांनी गेल्या महिन्यात केला होता. ज्यांचे आत्महत्याप्रकरण गाजते आहे त्या इन्टेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्याकडून वायकर दांपत्याने एक भूखंड सन २०१४ मध्ये खरेदी केला होता, असाही आरोप सोमय्या यांनी केला होता. रायगड जिल्ह्यातील या स्थावर मालमत्तांचा वायकर यांनी निवडणुकीच्या वेळी केलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला नाही, असेही सोमय्या यांचे म्हणणे होते. यावर वायकर दांपत्य म्हणते की,अन्वय नाईक यांच्या आत्महत्येवरून निर्माण झालेले वादंग पाहता त्यात गुंतलेल्या खर्‍या गुन्हेगारांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी सोमय्या हे असे आरोप करत आहेत.

वायकर म्हणतात की, सोमय्या यांनी हे आरोप करताना कोणतेही पुरावे आणि कागदपत्रे सादर केलेली नाहीत. हाती असे काही नसतानाही ते असे बेछूट आरोप करतात यावरूनच त्यांचा हेतू आम्हाला बदनाम करण्याचा आणि समाजात असलेली आमची स्वच्छ प्रतिमा मलिन करण्याचा आहे, हे स्पष्ट होते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button