येस बँक घोटाळ्यात वाधवान बंधूचा जामीन  फेटाळला

Dheeraj Wadhwan-Mumbai High Court

मुंबई :- येस बँक घोटाळ्याशी संबंधित ‘मनी लॉन्ड्रिंग’च्या प्रकरणात अटकेत असलेल्या दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचे प्रवर्तक कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बुधवारी फेटाळले.

केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) तपास करण्यासाठी ठरवून दिलेल्या मुदतीत परिपूर्ण असे आरोपपत्र सादर केले नाही, या मुद्द्यावर आपल्याला ‘डिफॉल्ट’ जामीन  मिळावा यासाठी वाधवान बंधूंनी अर्ज केले होते. त्यावर तीन दिवस प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर २३  ऑक्टोबर रोजी राखून ठेवलेला निकाल न्या. सारंग कोतवाल यांनी जाहीर केला.

वाधवान बंधूंच्या वतीने डॉ. अभिजित मनू सिंघवी व अमित देसाई या ज्येष्ठ वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यांचे म्हणणे असे होते की, तपासी यंत्रणेने ठरलेल्या मुदतीत केवळ तोंडदेखले आरोपपत्र दाखल करणे पुरेसे नाही. ते आरोपपत्र सर्व तपशील व सहपत्रांसह परिपूर्णही असायला हवे. अशा परिपूर्ण आरोपपत्राची न्यायालय जेव्हा दखल घेतते (Congnizance) तेव्हा वेळेत तपास पूर्ण झाला असे खर्‍या अर्थाने म्हणता येते. प्रस्तूत प्रकरणात या प्रक्रियात्मक बाबींची पूर्तता झालेली नसल्याने कायद्यास अभिप्रेत असलेले परिपूर्ण आरोपपत्र वेळेत सादर झालेले नाही. त्यामुळे आरोपी दंड प्रक्रिया संहितेच्या (Cr.P.C.) कलम १७३ अन्वये ‘डिफॉल्ट’ जामीन मिळण्यास पात्र ठरतात. त्यांचे असेही म्हणणे होते की, जे काही अपूर्ण आरोपपत्र सादर केले गेले तेही कोर्टाला न देता रजिस्ट्रीमध्ये सादर केले गेले. त्यामुळे आरोपपत्र वेळेत कोर्टापुढे सादर झाले, असे म्हणता येत नाही.

‘सीबीआय’च्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले की, आरोपपत्र दाखल करताना सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे व त्यात कोणताही त्रुटी नाही. कोरोनाच्या निर्बंधांमुळे आरोपपत्र थेट कोर्टात न देता रजिस्ट्रीत दाखल केले गेले, असेही त्यांनी निदर्शनास आणले होते.

याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासही (Enforcement Directorate) वाधवान बंधूंची कोठडी हवी आहे. परंतु मध्यंतरी उच्च न्यायालयाने त्यांना ‘ईडी’च्या त्या प्रकरणात ‘डिफॉल्ट बेल’ मंजूर केला. नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालास स्थगिती दिली आहे.

ही बातमी पण वाचा : निर्दयी ‘बीएमसी’ला सणसणीत चपराक

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER