विश्वनाथन आनंद यांना वाटले होते , “रौप्यपदकावरच समाधान मानावे लागणार”

Viswanathan Anand

बुध्दिबळाचे (Chess) विश्वविजेतेपद म्हणता येईल अशा ऑलिम्पियाड (Chess Olympiad) स्पर्धेत भारतीय संघाने रविवारी अतिशय नाट्यमयरित्या सुवर्णपदक जिंकले. जागतिक बुध्दिबळ नियंत्रण संस्था ‘फिडे’ने (Fide) ने रशियासोबत (Russia) भारताला (India) संयुक्त विजेते जाहीर केले. 163 देशांच्या सहभागातून भारतीय संघ अव्वल आला.

भारताचा अंतिम फेरीतील विजय एवढा नाट्यमय आणि अविश्वसनीय होता की माजी विश्वविजेते ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद (Vishwanathan Anand) यांनासुध्दा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांना तर वाटले होते की आपल्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागणार.

इंटरनेटद्वारे आॕनलाईन खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत निहाल सरीन व दिव्या देशमूख यांच्या डावादरम्यान सर्व्हर ठप्प पडल्याने त्यांचा मौल्यवान वेळ वाया गेला. त्यामुळे त्यांनी डाव गमावले आणि पहिल्या फेरीत रशियाला 3-3 बरोबरीत रोखलेल्या भारताने दुसरी फेरी 4.5- 1.5 अशी गमावली पण भारतीय चमूने अपील केले की निहाल व दिव्या यांचा पराभव तांत्रिक समस्येमुळे झाला आहे. दिव्या तर स्पष्टच विजयाच्या स्थितीत असताना समस्या आली. त्यामुळे निकालाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी भारताने फिडे कडे केली. परंतु उपांत्यपूर्व फेरीत भारताविरुध्दच अर्मेनियाचे असेच अपील ‘फिडे’ ने फेटाळून लावले होते त्यामुळे आशा नव्हतीच पण ‘फिडे’ने स्पर्धेचे तांत्रिक आयोजक चेस डॉट कॉम यांच्याकडून व बातम्यांद्वारे खात्री केली आणि खरोखरच इंटरानेट ठप्प पडल्याचे आढळून आल्याने भारत व रशियाला संयुक्त विजेते घोषीत केले.

भारतीय संघाचे सदस्य असलेले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद या नाट्यमय क्षणांबद्दल म्हणाले की, फार नाट्यमय घटना घडल्या. मंगोलियाविरुध्दच्या लढतीतही अशीच सर्व्हरशी संपर्क तुटल्याची समस्या आली होती. आता दुसऱ्यांदा आणि अतिशय महत्त्वाच्या लढतीत पुन्हा तेच घडले. मला वाटले की आम्हाला फक्त रौप्यपदकच मिळणार म्हणून मी निराश झालो होतो. ते गृहीत धरुन मी निहाल व दिव्या यांना वाईट वाटून घेऊ नका असे लिहिलेसुध्दा होते. कारण अशा घटनांनी तरुण खेळाडू विचलीत होत असतात. त्यानंतर आमचे न खेळणारे कर्णधार श्रीनाथ यांच्याशीही मी बोललो आणि त्यांनी सांगितले की आपल्याकडून कोणतीही अडचण नाही आणि फिडे’कडून माहिती घेणे सुरू आहे. त्यानंतर निकालासाठी बराच वेळ वाट बघावी लागली. मला वाटत होते की, ते आम्हाला पुन्हा खेळायला सांगतील. किंवा दुसऱ्या फेरीचे डाव पुन्हा खेळायला लावतील किंवा कमीत कमी काही डाव तरी पुन्हा खेळायला लावतील. या समस्येवर हाच उपाय आहे असे मला वाटले होते त्यामुळे संयुक्त विजेतेपदाची मी कल्पनासुध्दा केलेली नव्हती. पण शेवटी दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने हाच निर्णय योग्य होता. हा फारच सुखद शेवट होता.”

अर्थात ‘फिडे’ने घेतलेला भारताला संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय एकमताने नव्हताच.फिडेचे अध्यक्ष अर्कादी वोर्कोवीच हे रशियाचेच असल्याने ते अपिल पडताळणी समितीत नव्हतेच पण निर्णय होत नव्हता, एकमत होत नव्हते तेंव्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या अधिकारात भारत व रशियाला संयुक्त विजेते घोषीत केले. खरं तर भारतीय संघाला हा निकाल अपेक्षितच नव्हता म्हणून ते दुसऱ्या फेरीच्या तयारीला लागले होते त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

पहिल्या फेरीचे सर्वच्या सर्व सहा डाव बरोबरीत सुटले होते.

तांत्रिक समस्यांबद्दल आनंद म्हणाले की, समोरासमोर खेळतानासुध्दा समस्या येत असतातच. पण आॕनलाईन खेळताना अशा अडचणी येणारच हे नक्की. आता याचा अनुभव जसा वाढत जाईल तसतसा यावर उपायही शोधला जाईल. सध्यातरी मात्र या समस्या मनस्तापच वाढवत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER