विवेके क्रिया पालटावी !

हाय फ्रेंड्स ! आपल्या आंतरिक ऊर्मी, नैसर्गिक आवेग यांना नियंत्रणात ठेवणे , ऊर्जेला विधायक वळण देणे हे खूप आवश्यक असते . त्यांना जर सैल सोडलं , मोकाट सोडलं तर त्याच ऊर्मी, भावना आपल्याच शत्रू होतात आणि त्यांच्या तालावर आपल्याला नाचावं लागतं . आवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असते, सतत भानावर राहात जगणं . सदैव सावधान राहणे आणि विवेक जागृत ठेवणे. व्हाट्सअपवर येणारे मेसेजेस वाचण्यात वेळ जातो खरा; पण काही मेसेजेस किंवा एखादी पोस्ट अशीही वाचनात येते किंवा खूप जास्त आवडते, ज्यावर आपल्याला विचार करावासा वाटतो. अशीच एक पोस्ट आज मी वाचली. मुख्य म्हणजे ती फॉरवर्ड झालेली नव्हती तर माझ्या एका मैत्रिणीने ती स्वतः लिहिलेली होती. मला तिचं म्हणणं मनापासून पटलं. तिने साधारण लिहिले होते की, एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही, या अशा ह्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना खूप गर्व असतो. त्यांच्यामुळे आपल्या भावना दुखावलेल्या असतात असंही आपल्याला वाटतं.

पण निवांतपणे जर आयुष्यातील दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे विचार केला तर लक्षात येतं की, ज्यांनी आपल्याला दुखावलं म्हणून आपण त्यांना आयुष्यातून मजा करतोय ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच ! किती बरोबर आहे हे ! असे अनेक प्रसंग आपण बघतो आणि अनुभवतोसुद्धा ! ज्या वेळी आपल्याला वाटतं की, आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्या त्या वेळी मीही हा अनुभव घेतलेला आहे, की त्या आपल्या भावना वगैरे नसून, आपला अहंकार दुखावला गेलेला असतो ! आम्हाला आमचा हा अहं कायमस्वरूपी त्रास देत असतो. तुम्ही बघा की कुणी आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे किंवा कुणी आपली एखादी गोष्ट ऐकली नाही, पुरेसं महत्त्व दिलं नाही, मी एखादं काम केलं आणि त्याचं क्रेडिट कुणी मला दिलं नाही, कोणी माझ्याऐवजी समोरच्याची स्तुती केली या सगळ्यासगळ्यामध्ये जे राग, मत्सर, असूया, दुःख, या सगळ्या भावना त्या एका अपेक्षेतून निर्माण झालेल्या असतात.

आणि प्रत्येक वेळी मी , माझं, मला या गोष्टींना डावलल्या गेल्या असल्याचे कारण यामागे असते. आपल्याला जेव्हा वाटतं भावना दुखावल्या गेल्या आहेत ,त्यावेळी ते आपण अहंकाराला गोंजारलेले असते. समोरच्याची एखादी चूक, एखादी आपल्याला न आवडणारी कृती, एवढा मोठा प्रश्न होऊ शकत नाही. ज्यामुळे आपण आपल्या अनेक वर्षांच्या गोजिर्‍या साजिऱ्या नात्यांना चक्क आपल्यातल्या इगोमुळे सुळावर चढवत असतो. बरेचदा असं होतं की, समोरची व्यक्ती एखादी गोष्ट किंवा एखादी कृती करते, तेव्हा ते ती खूप सहजतेने, सवयीने करते . त्यात तिचा तसा काही उद्देशही नसतो किंवा त्या व्यक्तीला त्याची जाणीवही नसते.

पण त्याची शहानिशा न करता बरेचदा आपण त्या व्यक्तीला आयुष्यातून डिलीट करतो. बरेचदा असं होतं की, माझी प्रायॉरिटी एखाद्या क्षणाला अमुक एक असते, पण समोरची दुसऱ्याच गोष्टीला ! आणि मग जो तो आपल्या आपल्या प्रायॉरिटीजने चालतो. या ठिकाणी गरज असते ती समजूतदारपणाची. विश्वासाची आणि संवादाची. बरेचदा भावनाच माणसावर राज्य गाजवतात. भावनेच्या भारतच माणसं वागत असतात ,निर्णय घेत असतात, त्याच भाषेत बोलत असतात ,काही माणसं तर कधीच भानावर नसतात, तर एखाद्या नशेत असल्यासारखेच वागत असतात .गुलाम असतात भावनांची ! आणि त्यांना त्याची जाणीवही नसते. यासंबंधी एक गोष्ट आहे . एकदम संत तुलसीदास यांचे रामायणावर निरूपण सुरू होते. त्यांचे सुंदर काव्य ऐकण्याकरिता स्वतः हनुमंत म्हाताऱ्या माणसाचे रूप घेऊन हजर असतात. एके दिवशी संध्याकाळी सीतेला रावण व राक्षस कसे छळत होते याचे ते वर्णन करतात.

ज्या झाडाखाली सीता बसली होती ते झाड कसे शुभ्र फुलांनी भरलेले होते, याचा उल्लेख तुलसीदास करतात. प्रवचन संपल्यावर सर्व लोक निघून जातात . हनुमंत मात्र तुलसीदासाकडे येतात आणि म्हणतात , “कथा सुंदर झाली, पण एक चूक आहे.” तुलसीदास विचारतात, “कोणती चूक ?” त्यावर हनुमंत म्हणतात, “ज्या झाडाखाली सीता बसली होती त्या झाडाची फुले पांढरी नसून लाल होती.” तुलसीदास मात्र आपल्या मतावर ठाम असतात. शेवटी हनुमंत आपले स्वरूप प्रगट करतात आणि म्हणतात, “मी स्वतः येथे हजर होतो. ती फुले लाल होती .” पण तुलसीदास असे म्हणतात, “रामानेच मला ही दृष्टी दिली आहे, मी तर नाममात्र आहे. त्यामुळे हे खोटे असणे शक्यच नाही.” तुलसीदासही मागे हटायला तयार नाहीत. शेवटी सीतेचीच साक्ष काढायचे ठरते आणि प्रकरण सीतेच्या कोर्टात जाते . सीता म्हणते, “फुले पांढरी होती, पण हनुमंतराया मला त्रास होत असलेला पाहून तुम्हाला इतका क्रोध आला होता की ती तुम्हाला लाल दिसू लागली होती.” या प्रसंगात तुलसीदास दोन गोष्टी सांगू इच्छितात, की माणूस भावनावश झाला की त्याला वस्तुस्थिती वेगळी दिसू लागते. भावनांचे रंग त्यावर चढतात आणि तेच आपल्याला खरे वाटू लागतात.

पण रामाने दिलेल्या दिव्य दृष्टीमुळेच भ्रम दूर होतो, जे योग्य ते दिसायला लागते. म्हणूनच राम म्हणजेच विवेक, अहंकाररहित निरपेक्ष विचार आपले जीवन ध्येय ! आणि विवेक माणसाच्या जीवनावर प्रभाव गाजवत असतात. बरेच वर्षांपासूनचा असलेला नात्यांमधला समंजसपणाही कुठे तरी अचानक नाहीसा होतो; कारण अपमान झालेला असतो किंवा अहंकार दुखावलेला असतो. खरं तर भावना आणि आपला अहंकार यांच्यातली सीमारेषा खूपच पुसट आहे. त्यावेळी समोरच यांच्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून माझ्यातील काही चुका पाठवून त्या जर मान्य केल्या तर ही अहंकाराची बाधा आता कमी तरी करता येईल. खरं तर या जगात कुणाचं कुणावाचून अडत नाही. माणूस एकटा येतो आणि एकटाच जातो. परंतु आयुष्य आणि जगणं इतक्या रटाळ क्रिया नाहीत.

जर जगणं सुंदर करत जायचं असेल आणि आयुष्याची खोली वाढवायची असेल तर अशी उगीचच गैरसमजातून, अहंकारातून दुरावलेली नाती जवळ यायलाच हवीत. फ्रेंड्स ! माणूस आपल्याच भावनांच्या तुरुंगात अडकतो आणि योग्य निवड करण्याचे आपले स्वातंत्र्य गमावून बसतो. आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो. ज्या फांदीवर बसलेला असतो, तीच फांदी तोडण्याचे आत्मघातकी वर्तन करतो. म्हणूनच गीतेत तेच सांगितले आहे .आपणच आपला शत्रू व आपणच आपला बंधू आहोत. “उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी l आत्मा चि आपला बंधू ,आत्मा ची रिपू आपला l” नात्यांमधील समंजसपणा दूर करणार्‍या आपल्या भावना ह्या आपल्या अहंकारामधूनच जन्माला येतात .कारण खऱ्या सकारात्मक भावना या क्षमाशील असून अहंकार नात्यांना दुभंगणारा ! चांगल्या भावनांची जाणीवपूर्वक जोपासना आणि अहंकाराचे विसर्जन करूया.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER