“विटामिन ए — आत्मप्रतिष्ठा !”

Vitamin A Self Esteem

हाय फ्रेंड्स ! विटामिन ए (Vitamin A) डोळ्यांसाठी, दृष्टीसाठी आवश्यक असतेना ? त्याच प्रमाणे सकारात्मक दृष्टी साठी, आत्मप्रतिष्ठा ही पण डोळस आणि सकारात्मक असावी लागते. आणि एकूणच मानसिक जीवन स्वास्थासाठी आत्मप्रतिष्ठेचं A विटामिन खूप महत्त्वाचं ठरतं !

एक गोष्ट आहे. रेल्वे स्टेशन वर आपल्या एका हातात कि-चेन चा जुडगा आणि दुसऱ्या हातात भीक मागण्यासाठी एक वाटी, घेऊन एक धडधाकट माणूस उभा होता. ट्रेन स्टेशन मध्ये आली होती. एक तरुण अधिकारी तिकडून चालला होता. त्याने घाईघाईने त्या वाटीत काही पैसे टाकले, आणि तो ट्रेनमध्ये बसला. नंतर काहीतरी त्याच्या मनात आले आणि तो पटकन उतरला, आणि त्या भिकर्याच्या जवळची एक किचेन घेतली, आणि म्हणाला, “हा आता ठीक आहे. मी जेवढे पैसे दिले तेवढ्याचि कीचेन मी घेतली. शेवटी तू पण एक बिजनेस करतो आहे, आणि मी पण बिझनेस करणारा आहे.” आणि तो ट्रेनमध्ये परत जाऊन आपल्या जागेवर बसला. अगदी साधी घटना !

काही दिवसानंतर तो अधिकारी एका कार्यक्रमाला गेलेला असताना, तोच भिकारी तिथे सुटाबुटात त्याला आलेला दिसला. त्याने त्या अधिकार्याला ओळखलं आणि त्याच्या जवळ गेला. म्हणाला,” तुम्ही कदाचित मला ओळखणार नाही. पण माझ्या मात्र तुम्ही चांगले लक्षात राहिले आहात” त्यावर अधिकारी म्हणाला, की तु सांगितल्यावर मला आठवलं. पण मग तू असा इथे कसा? त्यावर भिकारी म्हणाला,” तुम्ही माझ्यासाठी काय केलं, याची कल्पना तुम्हाला नाही येणार. पण तुम्ही माझ्यातला स्वाभिमान ,आत्मप्रतिष्ठा मला परत मिळवून देणारे पहिलेच भेटला आहात”. तुम्ही त्या दिवशी म्हणाला, त्यावर मी खूप विचार केला. आणि मी इथे भीक का मागतोय असा विचार करून आयुष्यात काहीतरी चांगलं करण्या निश्चय केला आणि खूप मेहनत करायला सुरुवात केली. आणि त्यामुळेच मी आज येथे आलो. “तुम्ही मला ही जी दृष्टी दिली, माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, स्वत्वाची जाणीव करून दिली आणि त्याच्यामुळे माझा आयुष्य बदलून गेले आहे.”

ही बातमी पण वाचा : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या निमित्ताने…

पुण्यामध्ये एक डॉक्टर सोनवणे असे काम करतात. ते भिकाऱ्यांचे डॉक्टर ( डॉक्टर ऑफ बेगर्स ) म्हणूनच ओळखले जातात. प्रत्येक मंदिरापाशी भिकाऱ्यांवर मोफत उपचार करतात. त्यांना कामधंदा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतात, आणि मुख्य म्हणजे ते नेहमी आव्हान करतात की तुम्ही भीक घालू नका. कारण जे काही एखादे काम करू शकतात, आणि स्वाभिमानाची कमाई करू शकतात, त्यांना मदत करून आपण पण परावलंबी बनवत असतो .

वरती जी गोष्ट आपण बघितली त्यात याच प्रकारे भिकाऱ्याच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला? तर मुळात त्याचा स्वाभिमान जागा झाला. त्याचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलला. आपोआपच त्याची कार्यक्षमता वाढली.

हा स्वाभिमान किंवा आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय ? स्वतःला स्वतःबद्दल जो वाटतो तो स्वाभिमान ! आपले स्वतःचे मत स्वतः बद्दल काय आहे ते ! म्हणजे आत्मप्रतिष्ठा ! याचा फार दूरगामी परिणाम अनेक गोष्टींवर होत असतो.

अगदी आपली दैनंदिन कार्यक्षमता पासून ते आपण एक पालक म्हणून किती योग्यप्रकारे भूमिका निभावू शकतो हे सगळं आत्मप्रतिश्ठेवरच अवलंबून असतं .कारण मुले, ही टिपकागदाप्रमाणे असतात. आई-वडील त्यांचे रोल मॉडेल असतात. आत्मप्रतिष्ठा असणारी व्यक्ती कर्तृत्ववान आणि नम्र अशी असते, ज्याला आपण संस्कार म्हणतो ! एका वर्गात एक छान छोटीशी मुलगी होती ते बघून आपोआपच टीचर ने तिला विचारले की,” अगं !असं इतकं छान वागायला तुला कोणी शिकवलं? ती म्हणाली,” कुणीच नाही. म्हणजे आमच्या घरी सगळे असेच वागतात.”

आपल्या जन्मापासूनच स्वतःबद्दलची आत्मा प्रतिष्ठेची जाणीव, सकारात्मक किंवा नकारात्मक आकार घ्यायला लागते. जेव्हा या स्व जाणीवेला इतरांकडूनही पाठिंबा समर्थन मिळते, त्यामुळे ती दृढ होऊन” मी ही अशी किंवा मी हा असा “हे आपण ठरवत असतो. दुर्दैवाने नकारात्मक आत्मप्रतिष्ठा बनत गेली तर पूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम होतो.

ही बातमी पण वाचा : “एक तरी ओवी अनुभवावी !”(भाग-2)

तो कसा? आपल्याला काहीतरी स्वतःमध्ये योग्य बदल हवा आहे? किंवा मला माझ्या आत्मप्रतिष्ठा विषयी जाणून घ्यायचे आहे? मग कशी ओळखायची कमकुवत आत्मप्रतिष्ठा? मला माझ्याविषयी काय वाटतं, हे बघण्यासाठी जणू आपण एक आरसा समोर घेतोय आणि आत्ताच्या ज्या वर्णनात आपण बसू, त्यानुसार आपण आपली आत्मप्रतिष्ठा नक्की कशी ते ठरवू.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती जी काही स्वप्रतिमा आहे, ती कमकुवत असेल ,तरीही ती बळकट करता येते निश्चितपणे !आणि दुसरे मी स्वतः किंवा केवळ पालक याला जबाबदार नाहीत. तर ही गोष्ट अनेक गोष्टींवर अवलंबून असते हेही तितकेच महत्त्वाचे! मात्र ही आत्मप्रतिष्ठा जर “वधारली”(वाढली) तर आपली एकूणच कार्यक्षमता, उत्साह, उमदा स्वभाव आणि सुरळीत नाते संबंध निर्माण होऊ शकतात.

कारणं आपली जोपर्यंत स्वतःला स्वतःची किंमत किंवा सामर्थ्याची जाणीव होत नाही तोपर्यंत आपला स्वाभिमान उंचावून शकत नाही.

यशामध्ये सेल्फ मोटिवेशन ची भूमिका सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते.

आपल्या मर्यादांची जाणीव स्वतःला असणे हे जितके आवश्यक आहे, तितकीच ती जाणीव वास्तविक आणि योग्य आहे की नाही हेही तपासणे गरजेचे आहे. कमी आत्मसन्मान असेल तर अशी व्यक्ती उगीचच ध्येय छोटी छोटी ठेवते. sky is the limit. हा विचार करताना ती उगीचच बीचकते. मला हे जमेल का ? हा मनात प्रश्न करते.

मग कशा असतात साधारण अशा व्यक्ती?
जयवंतराव अशीच एक व्यक्ती! रिटायरमेंट घेतलेली सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या ज्येष्ठांच्या कट्ट्यांवर वेळ घालवतात, चकाट्या पिटायला किंवा टाईमपास करायला त्यांना खूप आवडते आणि सतत समोरच्या चुका काढणे, टीका करणे, दोष काढणे आणि मी कसा मोठा हे सांगणे हे काम तेही करतात. मात्र त्यांना कुणी काही सुचवलं सांगितलं तर मात्र त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबतात. नाही आवडत त्यांना ते! त्यांच्यातल्या नाजूक अहंकाराला धक्का बसतो. आणि अशा ह्या स्वभावामुळे त्यांना कोणीही प्रामाणिक व विश्वासू मित्र कधीच मिळत नाही. जयवंतराव हे कमी आत्मसन्मान असण्याचे एक उदाहरण आहे.

हळवेपणा आणि संवेदनशील पणा यामध्ये खूप फरक आहे तो लक्षात घ्यायला हवा. हळवेपण हे गुलाबासारखे असते. जर चुकून फुल तोडताना हात बाजूला गेला तर काटे लागतात. मात्र संवेदनक्षमता सकारात्मक असते. आस्था असणारे, काळजी घेणारी असते. मात्र “मला स्पर्श केला तर काटे असतील” हा अविर्भाव असतो आत्मसन्मान नसणाऱ्या व्यक्तींचा !त्यांची भावना कशामुळे दुखावेल ते सांगता येत नाही.

अशा व्यक्तींबरोबर व त्यांच्यासाठी काम करणे ही खूप अवघड गोष्ट असते. सुमेधा एक गृहिणी त्यामुळे (मी काय घरातच असते !) हा एक तिच्या हळवेपणा चा भाग! कमी आत्मप्रतिष्ठेतून आलेला. केवळ मी, माझे आणि मला याच विचारात गुरफटलेली असते. मैत्रिणींचा हेवा, द्वेष, मत्सर हे तर तीच्या पाचवीला पुजलेले ! सारखं एक तर स्वतःच्या चुकांबाबत सबबी सांगणे सुरू असते.

आपल्यातला कंमकुवतपणा दडवण्यासाठी, लपवण्यासाठी ती तेवढ्याच जोरात घरातल्या काम करणाऱ्या बायकांवर ओरडून बोलते. उद्धटपणाने वागते. त्यांचा पाणउतारा करते, ओरडत असते. ती स्वतःचा नसलेला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी! इतरांचा पाणउतारा करून, त्यांना खच्ची करणे, नाउमेद करणे, असे तिच्याकडून घडत राहते.

खरं तर अगदी “बीच्यारी “असे म्हणावे ,अशीही व्यक्तिमत्वे असतात. स्वतः बाबत कमी पणा आत्मसन्मान नसल्यामुळे जराही धोका, विरोध, टीका अशी शंका आली, तरी अशा लोकांच्या डोक्यावरचे अंटीने सारखे उभे राहतात, आणि आता ” त्याच्याशी सामना मलाच करावा लागणार आहे “अशा अर्थाने जरा कोणी ‘अरे ‘ म्हटले की हे ‘ कारे ‘म्हणायला तयार असतात. काहीशी असणार, भित्री वर्तणूक, पण सगळा वरवरचा आव आणणारी ही मंडळी !

मुळातच आत्मविश्वास नसल्याने सतत दुसऱ्याची मान्यता व पाठबळ ते मिळवायला बघतात. वर्तन हे दुसऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी अतिरेकी बढाया मारणारे असते.

फ्रेंड्स ! पण कुठल्याही प्रश्नाला अडचणींना उत्तर हे असतेच. जर वाटलं की आत्मप्रतिष्ठा कमी पडते आहे, तर ती वाढवता येतेच येते ! आणि आपल्या मुलांसाठी, पुढच्या भावी पिढीसाठी मात्र एक खूणगाठ बांधावी लागते. काय? तर डोरोथी एल नोलटे, यांच्या या “चिल्ड्रेन लर्न व्हॉट दे लिव्ह “या कवितेतील काही ओळी चे भाषांतर याचे उत्तर देते !

“बालपणात सतत झालेल्या कौतुकाचा वर्षाव, मोठेपणी दुसऱ्यांचही कौतुक करायला शिकवतो.

बालवयात इतरांकडून मिळालेली पसंतीची पावती, स्वतःवर प्रेम करायला शिकवते. तर बालपणातील मैत्रीपूर्ण वागणूक– मोठेपणी हे जग सुंदर आहे. तेथे जगणे हा एक अभूतपूर्व अनुभव आहे .ही जाणीव निर्माण करते.”असा त्याचा मतितार्थ आहे. थोडक्यात काय” पेराल तसे उगवेल” हे मात्र विसरता कामा नये.आत्मसन्मान कमी होण्याला काय कारणे असू शकतात ?

आणि मुख्य म्हणजे सकारात्मक आत्मसन्मानाकडे जाण्याचे मार्ग काय ? ते बघूया पुढच्या भागात !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER