नाशिक पोलीस आयुक्तपद सोडताना विश्वास नांगरे पाटील भावुक

Vishwas Nangre Patil

मुंबई : नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त (Nashik Police Commissioner) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) पदमुक्त झाले आहेत. पदभार सोडताना नाशिकच्या जनतेसाठी ऑडिओ मेसेजच्या (Audio message) माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेली दीड वर्ष नाशिकची सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करताना नांगरे पाटील भावुक झाल्याचे दिसते.

दरम्यान ठाकरे सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील ४० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नांगरे पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांचा ऑडिओ मेसेज
“नाशिककर नमस्कार, गेली दीड वर्ष आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली. आज मी पोलीस आयुक्तपदाचा चार्ज दीपक पांडे यांच्याकडे देऊन मुंबईला सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी रवाना होत आहे. गेली दीड वर्ष या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला पौराणिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रांत नाशिकची घोडदौड मोठ्या वेगाने सुरू आहे. इथे काम करताना इथली माती, इथली माणसं, इथलं पाणी, इथला निसर्ग यांच्या प्रेमात माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना निश्चित अंतःकरण जड आहे. पण हा ऋणानुबंध कायम राहील. आपल्या संपर्कात राहीन, आपले आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा करतो. कोव्हिड संक्रमणकाळ असो, निवडणुका किंवा सण-उत्सव, नाशिककर माझ्या पाठीशी कायम उभे राहिले. नाशिकची जनताच प्रगल्भ आहे, कायद्याचे पालन करणारी आहे. नाशिककरांच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी सदैव सुयश चिंतितो. जय हिंद!” – विश्वास नांगरे पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER