जोतिबासाठी विशाल एका आठवड्यात शिकला घोडेस्वारी

गुलाबी रंगाचा फेटा, पिळदार मिशा अशा रूपात जोतिबाचे (Jyotiba) दर्शन आजपर्यंत करोडो भाविकांनी घेतले आहे. कोल्हापुरातील जोतिबाच्या डोंगरावर असलेल्या या मंदिरात चैत्रयात्रेला मोठी गर्दी होते. दख्खनचा राजा या नावाने जोतिबा हे दैवत ओळखले जाते. जोतिबाचा महिमा मालिकेच्या रूपातून लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली असून जोतिबाची भूमिका कोण साकारणार ही चर्चा होती. आता सध्या या मालिकेच्या प्रोमोमधून अभिनेता विशाल निकम (Vishal Nigam) जोतिबाची भूमिका साकारणार असल्याचेही दिसून आले आहे. एक महिन्यात १८ किलो वजन कमी करण्याबरोबरच एक आठवड्यात घोडेस्वारी शिकत विशालने या भूमिकेसाठी स्वत:ला सज्ज केले आहे.

गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यावर देवदेवतांच्या कथांवर आधारीत मालिकांची क्रेझ आहे. अशा मालिकांना चांगला प्रेक्षकवर्ग मिळत असल्याचे लक्षात आल्यामुळे निर्मात्यांकडूनही देवतांचा महिमा सांगणाऱ्या मालिकांना हिरवा कंदील दिला जात आहे. गणपती, महादेव, गुरूदेव दत्त, खंडोबा या देवतांच्या मालिकांना यापूर्वीही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जोतिबाची ख्यातीही खूप मोठी असल्याने कोठारे व्हिजनने दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेची निर्मिती केली असून कोल्हापुरातील चित्रनगरी येथे या मालिकेचा सेट लावण्यात आला आहे. जोतिबाचे देवस्थान कोल्हापूर जिल्ह्यातच असल्याने या मालिकेच्या चित्रीकरणाचा नारळ कोल्हापुरात फुटला नसता तरच नवल. लॉकडाउनमध्ये मालिकांच्या चित्रीकरणाला आलेली मरगळ झटकून देत चित्रनगरीमध्ये आता जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर मालिकेच्या निमित्ताने होणार आहे.

एखाद्या देवावर जेव्हा मालिका येणार हे समजते तेव्हा प्रेक्षकांना पहिली उत्सुकता असते ती देवाची मुख्य भूमिका कोण करणार. त्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्याचा लूक आणि आजपर्यंत वर्षानुवर्षे मूर्ती रूपात पाहिलेल्या देवाचे दर्शन यांची सांगड घातली जाणार का. दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेच्याबाबतीतही प्रेक्षकांना हीच उत्सुकता होती. विशाल निकम हा अभिनेता पडद्यावर जोतिबा साकारणार असल्याचे सिक्रेट गेल्या काही दिवसात दिसत असलेल्या प्रोमोतून उघड झाले. विशालनेही जोतिबाच्या भूमिकेसाठी निवड झाल्यापासून खूप मेहनत घेतली आहे.

विशालला बॉडीबिल्डिंगची खूप आवड आहे. व्यायामाच्या आवडीतून त्याने सिक्सपॅक अॅब्जही बनवले होते. पण जेव्हा त्याची निवड जोतिबाच्या भूमिकेसाठी झाली तेव्हा त्याला एका महिन्यात १२ किलो वजन कमी करावे लागेल अशी अट घालण्यात आली. जोतिबाच्या भूमिकेसाठी ती गरज असल्याने विशालही लगेच वजन कमी करण्याच्या तयारीला लागला. विशालसाठी पुढचा टास्क होता तो घोडेस्वारीचा. जोतिबाचे वाहन घोडा असल्याने मालिकेसाठी विशालला घोडेस्वारी येणे आवश्यक होते. पण विशालने यापूर्वी कधीच घोडेस्वारी केली नव्हती. मग काय, विशालची घोडेस्वारीची शाळा सुरू झाली. फक्त एक आठवड्यात विशालने घोडेस्वारीचे धडे गिरवले. विशाल सांगतो, मी मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूरचा असल्याने जोतिबाचा महिमा लहानपणापासून ऐकत आलो आहे. जोतिबाच्या दर्शनासाठी चैत्रयात्रेला गुलालाने न्हाऊन जाणारा जोतिबाडोंगरही मी पाहिला आहे. त्यामुळे जेव्हा मला जोतिबाची भूमिका करायला मिळणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले तेव्हा मला आनंद तर झालाच पण दडपणही आले. कारण मी लाखो भक्तांच्या मनात असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा मला साकारायचा आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीमुळे या भूमिकेसाठी जे काही करायला लागेल, शिकायला लागेल त्यामध्ये जराही कसर बाकी ठेवायची नाही हे मी मनाशी ठरवले.

विशाल निकम हा शेतकरी कुटुंबातील आहे. सांगलीतील खानापूरमध्येच त्याने शालेय शिक्षण घेतले. कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यात आणि नंतर जिम ट्रेनर म्हणून त्याचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला. नृत्याची आणि अभिनयाची आवड त्याला होतीच. मिथुन हा त्याचा पहिला सिनेमा. दोन आठवड्यात साडेतीन कोटी रूपयांचा गल्ला जमवणाऱ्या या सिनेमाने विशाललाही ओळख दिली. धुमस या सिनेमातही तो झळकला होता. अक्षया हिंदळकर हिच्यासोबत विशालने साता जन्माच्या गाठी या मालिकेत काम केले. या मालिकेला फार काळ प्रेक्षकांच्या मनाची पकड घेता आली नसली तरी विशालने साकारलेला युवराज प्रेक्षकांना आवडला होता. या मालिकेनंतरही विशाल जिमट्रेनर म्हणून काम करतच होता. जेव्हा जोतिबा या मालिकेसाठी कास्टिंग सुरू होते तेव्हा विशालनेही आपले फोटो पाठवले. त्याची निवड झाल्याची बातमी त्याला कळाली आणि मग मात्र त्याच्या मनात गुलालाची उधळण सुरू झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER