औरंगाबाद : ‘ती’ ने केले पाणी प्रदुषित करणाऱ्या कंपन्यांविरोधात ‘वीरू’ स्टाईल आंदोलन

जवाहरनगर पोलिसांनी समजूत काढल्यावर पुढील अनर्थ टळला

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांच्या रसायनमिश्रीत पाण्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे . यापाण्यामुळे जनावरांना देखील धोका निर्माण होऊन जनावरे दगावत आहेत. ‘ती’ ने संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणही केले होते. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटी शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी शिवाजीनगर येथील जलकुंभावर चढून ‘ती’ ने विरूस्टाईल आंदोलन केले. जवाहरनगर पोलिसांनी समजूत काढून ‘ती’ ला जलकुंभावरून खाली आणल्याने पुढील अनर्थ टळला

शालू अर्जुल भोकरे( रा. घाणेगाव) असे आंदोलनकर्त्या महिलेचे नाव आहे. राष्ट्रीय निवारा परिषदेच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत.

याविषयी प्राप्त माहितीनुसार, वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्या रसायन मिश्रीत पाणी नदी, नाल्यात सोडत असतात. त्यामुळे परिसरातील विहिरी, नाले आणि नदीचे पाणी प्रदूषित झाले आहेत. रसायनयुक्त पाणी जमिनीत झिरपत असल्याने विहिरीसह बोअरवेलचे पाणीही पिण्यायोग्य राहीले नाही. रसायनयुक्त पाणी पिल्याने जनावरे दगावतात आणि माणसांना आंघोळीसाठीही हे पाणी वापरता येत नाही. यामुळे रसायनयुक्त पाण्याची योग्य विल्हेवाट न लावणाऱ्या कंपन्या बंद कराव्यात आणि या कंपन्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे या मागणीसाठी शालू भोकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनेक निवेदने दिली.

काही दिवसांपूर्वी त्यांनी या कार्यालयासमोर उपोषण केले. मात्र त्याच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. यामुळे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्या शिवाजीनगर येथील जलकुंभावर चढल्या यामुळे जलकुंभाखाली नागरीकांची गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्रध्दा वायदंडे आणि कर्मचाऱ्यांनी जलकुंभावर धाव घेतली.

पोलिसांनी समजवले आणि अनर्थ टळला

यावेळी सुरूवातीला जलकुंभाच्या अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे पोलिस आंदोलनकर्त्या भोकरे यांच्यासोबत बोलण्याचा पयत्न करत होत्या. मात्र त्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. असे असतांना सपोनि वायदंडे या त्यांच्याशी बोलत, बोलत जवळ गेल्या आणि त्यांचा हात पकडला. नंतर अन्य पोलिसांनी त्यांनी घेरले. यानंरतर त्यांची मागणी काय आहे. हे जाण्ून घेतले. समजूत काढल्यानंतर भोकरे यांना जलकुंभावरून खाली उतरवून पोलिस ठाण्यात नेले.