असा होइल व्हर्च्युअल राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा

National Sports Award

यंदा चर्चेचा विषय ठरलेल्या ‘जम्बो’ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचा (National Sports Awards) वितरण सोहळा राष्ट्रीय क्रीडा दिनी (National Sports Day) म्हणजे शनिवार, २९ रोजी पहिल्यांदाच व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. यानिमित्ताने देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ विजेत्या पाच जणांसह एकूण 74 जणांना सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र याला तीन विजेते खेळाडू कोरोनाची लागण झाली असल्याने आणि एकूण 9 खेळाडू उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यात खेल रत्न विजेत्या रोहित शर्माचाही समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) शनिवारी व्हर्च्युअल पध्दतीने विजेत्यांना पुरस्कार वितरण करणार आहेत.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्याला ७४ पैकी ६५ जण हजर राहणार आहेत मात्र ते एकाच ठिकाणी व राजधानीत नसतील तर हे विजेते भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या देशभरातीेल नऊ केद्रांवर उपस्थित राहून सन्मान स्विकारणार आहेत. या पुरस्कारांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने विजेत्यांची निवड झाली आहे.

पुरस्कार विजेत्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात नामवंत बॅडमिंटनपटू सात्विक साइराज रंकीरेडडी (Satvik Sairaj Rankireddy) आहे. कोरानाबाधित तिघांशिवाय खेलरत्न विजेता रोहित शर्मा (Rohit Sharma) व अर्जुन पुरस्कार विजेता ईशांत शर्मा (Ishant Sharma) हे दोघे आयपीएल (IPL) साठी युएई मध्ये असल्याने सहभागी होऊ शकणार नाहीत.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल पाच जणांना खेलरत्न आणि २७ जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. खेलरत्न विजेत्यांमध्ये हॉकी संघाची कर्णधार रानी रामपाल, क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीगीर विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि दिव्यांग पॅरालम्पियन मरियप्पन थंगवेलू आहे. यापैकी रानी रामपाल व मरियप्पन हे बंगळूरू येथून, विनेश ही सोनिपत येथून तर मनिका बत्रा ही पुणे येथून सहभागी होणार आहे.

या खेळाडूंच्या ट्रॉफीज, ब्लेझर व प्रमाणपत्र त्यांच्या केंद्रावर पोहचविण्यात आल्या आहेत. तिथे खेळाडू नेहमीच्या प्रथेप्रमाणे ब्लेझर परिधान करून उपस्थित असतील. त्यांच्या शेजारी ट्रॉफी ठेवलेली असेल. राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती त्यांचे सन्मानपत्र पङद्यावर दाखवतील आणि त्यानंतर पुरस्कार विजेते प्रथेप्रमाणे झुकून त्याचा स्विकार करतील आणि त्यानंतर ट्रॉफी हातात घेऊन छायाचित्र देतील.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंदीगड, बंगळुरू, पुणे, सोनिपत, हैदराबाद आणि भोपाळ केद्रांवर यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांबरहुकुम या सोहळ्याच्या प्रत्येक ठिकाणी आरोग्य व सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने म्हटले आहे. प्रत्येक विजेत्याला त्यांच्या जवळच्या समारंभस्थळी पोहचण्याआधीे कोविड-19 चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार आहे.

या व्हर्च्युअल समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद व्हिडीओ कॉन्फरन्सने राष्ट्रपती भवनातून सहभागी होणार आहेत. क्रीडा मंत्री व इतर मान्यवर हे विज्ञान भवन येथे उपस्थित असतील तर विजेते भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रांवर असतील. समारंभ व्हर्च्युअल होणार असला तरी त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER