प्रशिक्षक निवडीत विराटची भूमिका महत्वाची : सौरभ गांगुली

vurat-ganguly

कोलकाता : विश्वचषक (वर्ल्ड कप-२०१९) स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वीच हे निर्णय घेण्यात येतील असा अंदाज होता. कर्णधार पदी रोहित शर्मा यांची वर्णी लागणार होती. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यात सर्व प्रकारचे कर्णधार पद विराटकडे कायम राहिल्याने टीम इंडियात बदल होण्याचे सर्व संकेत फेल ठरले.

विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. भारतीय क्रिकेट संघासाठी सध्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, प्रशिक्षक निवडीमधील विराट कोहलीच्या भूमिका महत्वाची असल्याचे मत माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदी कोण असावे, याबाबत आपले मत मांडण्याचा त्याला अधिकार आहे, असेही गांगुलीने म्हटले आहे.

कोलकात्यात एका कार्यक्रमादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक निवडीबाबत भाष्य करताना गांगुली म्हणाला की, विराट कोहली हा संघाचा कर्णधार असल्याने त्याला प्रशिक्षकाबाबत मत मांडण्याचा अधिकार आहे.” दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराट कोहलीने रवी शास्त्री हेच संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास संघाला आनंद होईल, असे म्हटले होते. सीएसीने याबाबत माझ्याकडे विचारणा केलेली नाही. मात्र तशी विचारणा झाल्यास मी रवी शास्त्री यांचेच नाव घेईन, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. मंगळवारी या पदांसाठीची अर्ज करण्याची मुदत संपली असून रवी शास्त्री यांच्या पदावर दावा सांगण्यासाठी पाच जणांचे अर्ज आले आहेत. मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी ही कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समितीकडे असेल आणि या प्रक्रियेत कोहलीचे मत घेतले जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पण, कॅप्टन विराट कोहलीने या पदासाठी रवी शास्त्रींच्या पारड्यात वजन टाकल्याने निवड प्रक्रियेत वळण येण्याची चिन्हे आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माजी व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी अर्ज केले आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रविण आम्रे यांनी फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे.

बीसीसीआय आता प्रशिक्षकाची निवड वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर करेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र सौरभ गांगुली यांच्या वातव्याने प्रशिक्षकाची निवड करण्यात नियामक समितीचा कास लागणार आहे.